नारायणगाव: नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 22 किलोंच्या क्रेटला 1000 ते 1100 रुपये बाजारभाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कडाक्याच्या थंडीने मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. सध्या दररोज तीन ते चार हजार टोमॅटो क्रेटची आवक होत आहे.
नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये बुधवारी (दि. 17) सुमारे तीन ते चार हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. येथे 22 किलो वजनाच्या एका क्रेटला 900 ते 1100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. प्रामुख्याने गावठी टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळाला. संकरित जातीच्या टोमॅटोला 800 ते 950 रुपयांपर्यंत दर मिळाला.
नारायणगावच्या टोमॅटो मार्केटची वेळ सकाळी सात ते टोमॅटो विक्री संपेपर्यंत असते. परंतु, थंडीमुळे आवक कमी झाल्यामुळे साडेसहा वाजताच व्यापारी टोमॅटो खरेदी करण्यासाठी हजर राहतात. सध्या बाहेरचे व्यापारी कमी झाल्यामुळे स्थानिक व्यापारी या ठिकाणी टोमॅटोला बाजारभाव चांगला देत आहेत.
नारायणगावचे टोमॅटो मार्केट नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते. एखाद्या शेतकऱ्याचे पैसे वेळेवर मिळाले नाही किंवा ठरल्याप्रमाणे दर दिला नाही किंवा टोमॅटो खरेदी केल्यानंतर क्रेट खाली करून घेताना भाव कमी करण्याचा प्रयत्न झाला तर बाजार समितीच्या नारायणगाव कार्यालयाशी संपर्क साधावा.संजय काळे, सभापती, बाजार समिती नारायणगाव
सध्या थंडी अधिक असल्यामुळे टोमॅटो पिकाला उष्णता कमी मिळते. त्यामुळे टोमॅटोचे फळ लवकर पक्व होत नाही. अनेकदा शेतकरी टोमॅटो हिरवी तोडून आणतात. त्यानंतर व्यापारी टोमॅटो दोन दिवस स्वतःकडे ठेवतात. टोमॅटो लाल झाल्यावर विक्री करावी लागते. तसेच लहान-मोठे एकत्र आणलेल्या टोमॅटोला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्गीकरण करून टोमॅटो लाल झाल्यावरच विक्रीला आणावेत.योगेश घोलप, टोमॅटो व्यापारी