नारायणगाव: नारायणगाव-ओझर रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन पादचारी महिलांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती फौजदार जगदेव पाटील यांनी दिली.
या अपघातात आशा नामदेव शेळके (वय 47, रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला असून, कौशल्या भागुजी बेनके (वय 45, रा. धनगरवाडी) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. धनगरवाडी येथील आशा शेळके व कौसल्या बेनके ह्या गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव-ओझर रस्त्याच्या कडेने धनगरवाडी येथून नारायणगावच्या दिशेने मॉर्निंग वॉक करीत होत्या.
दरम्यान भरधाव ट्रॅक्टरमधील साऊंड सिस्टिमचा आवाज मोठ्याने करून नारायणगावच्या दिशेने निघालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीने दोघींना मागून धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून आशा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर कौसल्या बेनके या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे शेळके कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक हा ट्रॅक्टरसह फरार झाला. याप्रकरणी विनोद एकनाथ शेळके यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे नियमांचे उल्लंघन करून ट्रक व ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे होणारी धोकदायक ऊस वाहतूक जीवघेणी ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचा धनगरवाडी ग््राामस्थांनी निषेध केला आहे.
दरम्यान नारायणगाव-ओतूर रस्त्याला धनगरवाडी ते कारखाना फाट्यादरम्यान वारंवार अपघात होत असल्यामुळे धनगरवाडी परिसरातील नागरिकांनी 12 वाजण्याच्या सुमारास कारखाना फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याला साईड पट्टे त्याचबरोबर गतिरोधक आणि रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी मोठा इंडिकेटर बसवण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरण्यात आली होती. नारायणगावचे फौजदार जयदेव पाटील व त्यांचे टीम घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनामध्ये विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समिती संचालिका प्रियांका शेळके सहभागी झाल्या होत्या.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व प्रमाणापेक्षा जास्त उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मालवाहू ट्रकवर कारवाई करावी.महेश शेळके, सरपंच, धनगरवाडी