नारायणगाव: सध्या केळीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. लाखो रुपये खर्च करून घेतलेले केळीचे पीक बाजारभाव गडगडल्यामुळे परवडेनासे झाले असून अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, उंबज, धोलवड आदी भागांमध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. हुकमी नगदी पीक म्हणून केळी पिकाकडे शेतकरी पाहात असतो. मात्र यावर्षी केळीला किलोमागे केवळ 10 ते 12 रुपये एवढाच दर मिळत असल्याने केळी तोडणे, वाहतूक करणे व विक्री करणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केळी कापणेच बंद केले आहे.
सध्या जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी पडत असून त्याचा केळी पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच बाजारभावात झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीचे घड कापून ते मेंढरांना घातल्याचेही दिसून येत आहे.
दरम्यान, टोमॅटो वगळता इतर भाजीपाला तसेच नगदी पिकांना बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
याउलट सध्या कडाक्याच्या थंडीचा फायदा हरभरा आणि गहू पिकाला होत असून ही पिके चांगली तरारली आहेत. मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागल्याने गहू आणि हरभरा पिकांवर तुडतुडा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर पडत असल्याने चिंतेत भर पडली आहे.