Orange Pudhari
पुणे

Nagpur Orange Price: नागपुरी संत्री झाली स्वस्त! प्रतिकिलो ४० ते ७० रुपयांत उपलब्ध

गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज ५० ते ६० टन आवक; संत्र्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आंबट-गोड चव आणि रसाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्याचा हंगाम ऐन भरात आला आहे. विदर्भातून संत्र्याची मुबलक आवक सुरू झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात संत्र्यांची रेलचेल वाढली आहे.

हंगाम बहरल्याने संत्र्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली असून, चवीला गोड असलेली संत्री आता सर्वसामान्यांच्या खिशालाही परवडू लागली आहेत. प्रतिकिलो ४० ते ७० रुपयांत दर्जेदार संत्री मिळत असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात नागपूर, अमरावतीसह अहिल्यानगर परिसरातून संत्र्याची आवक होत आहे. सध्या दररोज ५० ते ६० टन संत्री बाजारात दाखल होत असून, त्यामध्ये गोड, रसाळ आणि दर्जेदार फळांचे प्रमाण अधिक आहे.

आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने घाऊक बाजारातील दर उतरले आहेत. प्रतवारीनुसार डझन आणि पेटीमागील दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली असून, २० किलोच्या संत्र्याच्या ट्रेला ८०० ते १ हजार ४०० रुपये भाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चढ्या दरामुळे ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेलेली संत्री आता स्वस्त झाली आहेत.

हंगामातील ताजी आणि दर्जेदार संत्री कमी दरात उपलब्ध झाल्याने खरेदीला वेग आला आहे. बाजारातील वाढत्या आवकेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, संत्र्यांच्या खरेदीसाठी वर्दळ वाढल्याची माहिती फळांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT