पुणे: 'विकसित पुण्यासोबतच आता सुरक्षित पुण्याला आमचे प्राधान्य असेल,' असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्याच्या भविष्यातील विकासाचा 'रोडमॅप' मांडतानाच राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.
पुणे शहराला 'फ्लेक्समुक्त' करण्याचा शब्द पाळणार असल्याचे मोहोळ यांनी ठामपणे सांगितले. "शहराचे विद्रुपीकरण चालणार नाही. मी स्वतः महापालिका आयुक्तांना सर्व अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे आदेश दिले आहेत. मग ते फ्लेक्स कोणत्याही पक्षाचे असोत, अगदी आमच्या कार्यकर्त्यांचे असले तरीही त्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, पुण्याच्या विस्तारीकरणासाठी १५० एकर जागा मिळत आहे. देशात सर्वाधिक विमानतळ महाराष्ट्रात (१४) आहेत. १० वर्षांपूर्वी देशात ७४ विमानतळ होती, ती आता १६५ झाली आहेत. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी सहकार मंत्रालयाने देशात मोठे काम उभे केले आहे. सहकाराचे विद्यापीठ स्थापन झाले असून पुढील १० वर्षांत या क्षेत्रात क्रांतिकारी बदल दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीतील विजयाचे विश्लेषण करताना ते म्हणाले, आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढलो. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर टीका केली, नकारात्मक प्रचार केला, पण आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. पुणेकर सुज्ञ आहेत, त्यांना राजकारण्यांच्या भांडणात रस नसून कामात रस असतो. शिवसेनेसोबतच्या (शिंदे गट) युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आकडेवारीमध्ये एकमत न झाल्याने युती होऊ शकली नाही, मात्र आगामी काळात जास्तीत जास्त युती व्हावी, यासाठी पक्ष नेतृत्वाच्या सूचना असून त्याबाबत प्रयत्न केले जातील.
मोहोळ यांनी पुण्याच्या विकासाचे काही मुख्य मुद्दे मांडले:
नदीकाठ सुधारणा प्रकल्प या प्रकल्पाची कामे वेगाने पुढे नेणार.
समान पाणी पुरवठा ८० टक्के काम पूर्ण झाले असून पुणेकरांना समान पाणी मिळण्याचा उद्देश लवकरच साध्य होईल.
नायडू हॉस्पिटलच्या जागेवर मेडिकल कॉलेजचे काम सुरू असून त्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देणार.
खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे महापालिकेत विलीन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुणेकर जनता हीच खरी कारभारी आणि मतदार हाच राजा आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत, मालक नाही. पारदर्शक काम करणे, हेच आमचे कर्तव्य आहे.मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री