

आशिष देशमुख
पुणे: ‘गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 26 मधील सर्वच जागा आम्हीच सहज जिंकू,’ असा आत्मविश्वास भाजप नेत्यांना होता. मात्र, येथे त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. शेवटी चारपैकी तीनच जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग््रेाच्या गणेश कल्याणकर यांनी विजय मिळवत भाजपच्या विजयरथाला या ठिकाणी आव्हान दिले.
प्रभाग क्रमांक 26 (घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समताभूमी) हा भाग पूर्वी काँग््रेासचा गड मानला जायचा. अठरापगड जातींचे बहुसंख्य मतदार असलेला हा प्रभाग आहे. येथे मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तरीही 2017 च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन खासदार गिरीश बापट यांच्या कुशल नेतृत्वामुळे या ठिकाणी प्रथमच भाजपचे चारही उमेदवार निवडून आले होते. यावेळी देखील तोच आत्मविश्वास भाजपला होता.
मात्र, यंदा तसे झाले नाही. कारण, या भागातील विकासकामांबाबत मतदार मोठ्या प्रमाणावर नाराज होता. तसेच, चार वर्षांच्या खंडानंतर निवडणुका आल्याने प्रस्थापितांना आव्हान देणारे अनेक जण मैदानात उतरले होते. त्यामुळे भाजपने काही बदल येथे केले. पण काही भागांत निष्ठावंत दुखावले होते. त्या नाराजीचा फटका 26 (अ) मध्ये बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग््रेासकडून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गणेश कल्याणकर यांनी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू हरिहर यांना अटीतटीच्या लढतीत पराभूत केले.
सहाजिकच भाजपला 2017 प्रमाणे चारही जागा येथे राखता आल्या नाहीत. याच प्रभागात ’ब’ गटातून स्नेहा माळवदे, तर ’क’ गटातून ऐश्वर्या थोरात प्रथमच निवडणूक लढत असल्यातरी मोठे मतविभाजन झाल्याने त्यांचा विजय सोपा झाला. सर्व पक्षांतील महिला उमेदवारांत इथे मोठी चुरस दिसली.
’ड’ गटातून राष्ट्रवादी काँग््रेासचे विजय ढेरे यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतलेली दिसली. या ठिकाणी प्रामुख्याने मुस्लीम मतदारांत त्यांची चांगली प्रतिमा दिसली. मात्र, इथे भाजपचे मुरब्बी कार्यकर्ते अजय खेडेकर यांनी विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवले. एकूणच भाजपसाठी 2017 च्या तुलनेत या प्रभागात वातावरण सहज विजय मिळवून देणारे नव्हते. तरीही भाजपने एक जागा गमावून तीन जागी विजय मिळवला.