Arrested Pudhari
पुणे

Munitions India Limited Bribery Case: पुण्यात म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमधील कथित लाचखोरी उघड; कार्यकारी संचालकासह तिघांना अटक

सीबीआयची पुण्यासह म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीत छापेमारी; एकूण सुमारे २ कोटी २३ लाखांची रोकड जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमधील (एमआयएल) कथित लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. निविदा आणि अधिकृत कामांमध्ये खासगी कंत्राटदारांना अनुकूल निर्णय मिळवून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कंपनीच्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणात पुण्यातील कार्यकारी संचालकाच्या कार्यालयासह निवासस्थानी छापे टाकण्यात आले. या कारवाईत १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथील छाप्यांतही सुमारे ५० लाख रुपये हाती लागले आहेत. सीबीआयने या प्रकरणी दि. १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला होता.

संबंधित अधिकारी पुण्यात कार्यरत असताना काही खासगी कंत्राटदार आणि पुरवठादारांशी संगनमत करून त्यांना अधिकृत कामांमध्ये अनुकूल निर्णय मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीबीआयने तपास सुरू केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयच्या पथकांनी संशयितांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. पुण्यातील कार्यकारी संचालकाच्या कार्यालयासह निवासस्थानाची झडती घेण्यात आली. या वेळी १ कोटी ७३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथील संबंधित ठिकाणांवरही झडती घेण्यात आली. तेथे सुमारे ५० लाख रुपयांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाल्याचे समजते.

कंत्राटदारांशी संगनमताचा संशय

निविदा प्रक्रिया आणि अधिकृत कामांमध्ये खासगी कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी लाचेचे व्यवहार होत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच जप्त करण्यात आलेली रोकड आणि कागदपत्रांचा कथित लाचखोरीशी काय संबंध आहे, याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित कंत्राटदार आणि संभाव्य इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू असून, त्यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT