Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Municipal Employee Welfare: महापालिकेचा कर्मचारी कल्याण: कामावर मृत्यू झाल्यास कुटुंबांना ५ लाखांचा तत्काळ मदत लाभ

कार्डिॲक कक्ष उभारण्याचा निर्णय; हृदयविकाराच्या आपातस्थितीत तातडीची मदत उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेत काम करत असताना कामाच्या ठिकाणी हृदयविकारामुळे किंवा इतर काही कारणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महापालिका त्याच्या कुटुंबियांना आता तत्काळ 5 लाखांची मदत देणार आहे. या साठीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ‌‘कामगार कल्याण विभागा‌’ला दिले आहेत.

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. यातील एकाचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना लक्षात घेत प्रशासनाने तातडीची मदत योजना देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कामावर असताना मृत्यू झाल्यास महापालिकेकडून 75 हजार रुपयांची मदत दिली जाते. शहरात महापालिकेचे सुमारे 18 हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक अपघात विमाही उतरविण्यात आला आहे. अपघात किंवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 25 लाखांपर्यंत मदत मिळते.

मात्र, नैसर्गिक मृत्यूसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने कुटुंबियांना तातडीची मदत मिळत नाही. भविष्यात अशा प्रसंगात कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा यासाठी आता 5 लाखांचा तत्काळ मदत लाभ तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापालिकेत कार्डिॲक कक्ष उभारण्याचा निर्णय

महापालिकेच्या मुख्य इमारतीत दररोज जवळपास 3 हजार कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात. तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास महापालिकेकडे कार्डिॲक रुग्णवाहिका उपलब्ध आहे; मात्र, त्यात डॉक्टर उपलब्ध नसणे ही गंभीर अडचण कायम आहे. दोन दिवसांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा देखील रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याने उपचार सुरू करण्यात विलंब झाला.

या घटनांमध्ये पथ विभागाचे शिपाई अशोक वाळके यांचा मृत्यू झाला, तर वरिष्ठ लिपिक छाया सूर्यवंशी आणि आरोग्य निरीक्षक राहुल शेळके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र कार्डिॲक कक्ष उभारण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT