पुणे

Mundhwa Land Deal : मुंढवा जमीन व्यवहारात अजित पवारांच्‍या पीएसह ओएसडींचाही सहभाग : अंजली दमानियांचा गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत कागदपत्रे आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटही दाखवले, पॉवर ऑफ ॲटर्नीमधील प्रत्येक पानांवर पार्थ पवार यांची सहीसह फोटोही

पुढारी वृत्तसेवा

  • मुंढवा जमीन दस्तावेज : २०२१ मधील पॉवर ऑफ ॲटर्नीवर पार्थ पवारांची सही असल्याचा दावा

  • पार्थ पवारांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी, सहभाग

  • कारवाई न झाल्यास पुन्हा खरगे समितीसमोर म्‍हणणं माडणार असल्‍याची स्‍पष्‍टोक्‍ती

Anjali Damania on Mundhwa Land Deal

मुंबई : राज्‍यातील बहुचर्चित मुंढवा जमीन व्‍यवहार घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (दि. २२) पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारातील पॉवर ऑफ ॲटर्नीमधील प्रत्येक पानांवर पार्थ पवार यांची सही आणि फोटो देखील आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए आणि ओएसडी (OSD) सहभाग असल्‍याचा दावा करत त्‍यांनी कागदपत्रे आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटही दाखवले. पार्थ पवारांसह संबंधितांवर तत्‍काळ तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कारवाई न झाल्यास पुन्हा खरगे समितीसमोर म्‍हणणं माडणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी विजय कुंभार देखील उपस्थित होते.

कागदपत्रे आणि चॅटिंगचे पुरावे केले सादर

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे आणि चॅटिंगचे पुरावे सादर केले. विशेष बाब म्‍हणजे ही संबंधित कागदपत्रे या प्रकरणातील संशयित ग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांचे वकील असलेल्या वकील तृप्ता ठाकुर यांनीच आपल्‍याला पाठविल्‍याचे सांगत त्या म्हणाल्या, “२०२१ मध्ये झालेल्या मुंढवा जमिनीच्या पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो आहे. ॲड. तृप्ता ठाकूर यांनी हे सर्व पुरावे पाठवले असून, यामध्ये दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांचे चॅटिंगही समोर आले आहे. यामध्ये ईओडब्ल्यू (EOW) अधिकारी वाघमारे यांचा नंबरही पाठवण्यात आला होता. हे सर्व पुरावे पोलिसांकडे असूनही पार्थ पवारांवर कारवाई का केली जात नाही?”, असा सवाल त्यांनी केला.

‘त्या’ चार अधिकाऱ्यांचा सहभाग?

दमानिया यांनी आरोप केला की, या व्यवहारात अजित पवारांचे पीए आणि तीन ओएसडींचा थेट सहभाग होता. यामध्ये संतोष ढाकणे, राम चौबे, संतोष हिंगणे आणि विकास पाटील या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असून, त्यांचे चॅटिंगही समोर आले आहे. संतोष ढाकणे यांचा यात पूर्ण सहभाग असून, चौकशीसाठी हजर राहण्याच्या पत्रांनंतर या अधिकाऱ्यांचे सतत कॉल्स येत होते, असा दावा त्यांनी केला.

..तर उद्या पुण्याला जाणार

अंजली दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “जर पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला नाही आणि अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करणार आहोत. मी पुन्हा खरगे समितीसमोर उभी राहणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

एकाच नोटरीकडून सर्व कागदपत्रे बनवली : विजय कुंभार

यावेळी विजय कुंभार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “गेल्या ५–६ वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. एकाच नोटरीकडून सर्व कागदपत्रे बनवून घेण्यात आली आहेत. २५ मे २०२१ रोजी हा व्यवहार झाला असून सर्व कागदपत्रे सरकारदरबारी उपलब्ध आहेत. अजित पवारांना या सर्व गोष्टींची कल्पना होती; परंतु मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री त्यांना संरक्षण देत आहेत,” असा आरोप कुंभार यांनी केला.

आमच्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा करावा

“आम्ही केलेल्या आरोपांवरून त्यांनी खुशाल आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करावा, आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत,” असे आवाहन देत त्याआधी या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विजय कुंभार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT