मुंढवा: मगरपट्टा- मुंढवा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवारी (दि.2) रात्री बारा वाजता एक अवजड क्रेन पलटी झाल्यामुळे उड्डाण पुलावरील एका बाजूची वाहतूक बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत बंद होती. नंतर दुपारी तीन ते पाचदरम्यान क्रेन बाजूला काढण्यासाठी दोन तास वेळ लागला. यावेळी पुलावरील दोन्ही बाजूंचे रस्ते बंद केल्याने मुंढवा, घोरपडी व केशवनगर परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर सर्वत्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावर रात्री क्रेन पलटी झाल्यामुळे रात्री उड्डाणपुलाची एक बाजू पूर्ण बंद होती. दुसऱ्या बाजूने बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक सुरू होती. वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंढवा वाहतूक पोलिसांनी दुपारी तीन वाजता ही क्रेन काढण्यास सुरुवात केली.
क्रेन काढताना उड्डाणपुलावरील दुसऱ्या बाजूची वाहतूकही बंद करण्यात आली. त्यामुळे मगरपट्टा- मुंढवा या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद झाली. यावर उपाययोजना म्हणून मगरपट्टा-खराडी या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बी. टी. कवडे रोडमार्गे वळवण्यात आली. त्यामुळे घोरपडी, मुंढवा व केशवनगर तसेच खराडी रस्ता येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामध्ये शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा व व्हॅन अडकून पडल्यामुळे पालकांना काळजी लागून राहिली होती.
तिन्ही पुलांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने वाहतूक कोंडीत भर
मुंढवा येथील महात्मा फुले चौक हा पुणे शहरामधील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा चौक म्हणून ओळखला जातो. त्यातच या परिसरातील कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल, घोरपडीतील साईबाबा मंदिर रेल्वे उड्डाणपूल व केशवनगर- खराडी नदीपात्रावरील पूल या तीनही पुलांची कामे मागील काही महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे वाहने जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली. पालिका प्रशासनाने या तिन्ही पुलांची कामे जलदगतीने मार्गी लावावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी रात्री बारा वाजता मगरपट्टा-मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावर क्रेन पलटी झाली. क्रेन मोठी असल्याने बुधवारी दुपारी क्रेन काढण्यासाठी वेळ गेला. मात्र, नंतर झालेली वाहतूक कोंडी आम्ही नियंत्रण आणली.संदीप जोरे, सहायक पोलिस निरीक्षक, मुंढवा वाहतूक विभाग