पुणेः घरात हुक्का पार्लर थाटून फोनद्वारे ऑर्डर घेत सर्व्हिस देणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी पकडल्यानंतर, मुंढवा पोलिसांनी देखील दुचाकीवरून हुक्क्याचे साहित्य विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून 1 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहरुख बिलाल अहमद (वय.21,रा. साईनाथनगर वडगावशेरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी, मुंढा पोलिसांनी शाहरुखच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंढवा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी स्वप्निल रासकर, अक्षय धुमाळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बी.टी कवडे क्रिडांगण घोरपडी येथे एक व्यक्ती त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना अवैधरित्या हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी येणार आहे.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजु महानोर, उपनिरीक्षक युवराज पोमण यांनी सापळा रचून शाहरुख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता, हुक्क्याचे साहित्य, विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर्स मिळून आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, गुन्हे निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
हुक्का वाल्यांची नामी शक्कल
अवैधपद्धतीने हुक्का विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगरला आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे. मात्र विमानतळ आणि मुंढव्यातील कारवाई पाहता, हुक्कावाल्यांनी थेट ग्राहकांना पाहिजे तेथे हुक्का पुरविण्यास सुरूवात केल्याचे दिसून येते. विमानतळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांनी घरातच हुक्का पार्लर थाटल्याचे दिसून आले होते.