MPSC Paper Leak Protest Pudhari
पुणे

MPSC Mega Recruitment: एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह ७० हजार पदांची मेगाभरती सुरू करण्याची मागणी; २६ सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा

स्पर्धा परीक्षार्थींचा पुणे पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा; पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा प्रक्रियेबाबत नाराजी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह राज्य सरकारने जाहीर केलेली ७० हजार पदांची मेगाभरती तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी पुन्हा दि. २६ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणामुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणात आयोगातील अवर सचिव आणि सहायक कक्ष अधिकाऱ्यांना अटक झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवरील स्पर्धा परीक्षार्थींचा विश्वास कायम ठेवण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही मागण्यांवर निर्णय झालेला नसल्याचे स्पर्धा परीक्षार्थींनी स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

गणपती विसर्जनानंतर अलका टॉकीज चौक, अहिल्या अभ्यासिका किंवा एस. एम. जोशी पूल, गरवारे कॉलेज यापैकी एका ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना धमकीवजा नोटिसा न देता आंदोलनाला सहकार्य करावे, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT