

पुणे: वाघोली परिसरातील नवव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून २३ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
जड वाहने, ट्रॅव्हल बससाठी पर्यायी मार्ग
पुण्याकडून नगर रोडमार्गे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांनी सादलबाबा चौक–चंद्रमा चौक–विश्रांतवाडी–आळंदी–शिक्रापूर मार्गाचा वापर करावा. नगर रस्त्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी शिक्रापूर–चाकणमार्गे पुढे जावे. तर, नगर रस्त्याने पुण्यात येणाऱ्या वाहनांनी लोणीकंद–केसनंद गाव–थेऊर फाटा–सोलापूर रस्त्याचा पर्यायी मार्ग वापरावा.
हलक्या वाहनांसाठी मार्ग
अहिल्यानगरकडून पुण्याकडे येणाऱ्या हलक्या चारचाकी वाहनांनी लोणीकंद–केसनंद–थेऊर गाव–थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे जावे. पुण्याकडून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी वाघेश्वर चौकातून डावीकडे वळून भावडी गाव–सुरभी माथा (लोणीकंद) मार्गे पुढे जावे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलासह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक बदलातून वगळण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.