

पुणे: शहरातील अनधिकृत पीजी हॉस्टेल, तसेच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या भंगार गोदामांविरोधात पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत वडगाव बुद्रुक, नऱ्हे आणि धायरी परिसरातील १३ पीजी व हॉस्टेल आणि सात भंगार गोदामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर आणि बांधकाम विभागाचे अभियंता विश्वजित वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. अनेक पीजी आणि हॉस्टेलमध्ये अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, तसेच योग्य विद्युत व्यवस्था नसल्याचे आढळले.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. रहिवासी भागातील पत्र्याच्या शेडमध्ये प्लास्टिक, स्टील, लोखंड, कागद आणि पोती यांसारख्या ज्वलनशील वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले. काही ठिकाणी भंगार साठवणुकीसोबतच त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे आढळले.
परवानग्यांकडेही काणाडोळा
बीडीपी झोनमधील जागांचा वापर, अरुंद रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, कर आकारणी, तसेच अधिकृत वीजपुरवठ्याबाबत आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचे तपासणीत आढळले. अनेक ठिकाणी संपूर्ण इमारती किंवा जागा भाडेतत्त्वावर दिल्याचे दिसून आले. मात्र, जागामालकांकडून तेथे सुरू असलेल्या व्यवसायावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
गुन्हे दाखल करण्याचे आदेश
नियमांचे उल्लंघन करून तसेच आवश्यक परवानग्या न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करून त्या तत्काळ सील करण्याचे निर्देश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशा आस्थापनांवर महापालिका आणि अग्निशमन दलाची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
कारवाई सुरूच राहणार
बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र यांसह आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याने जागामालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अग्निसुरक्षेचे नियम आणि आवश्यक परवानग्यांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांची तपासणी मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याने अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.