मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव येथीलश्री मयूरेश्वर मंदिरात गणेश जयंती माघी यात्रा प्रतिपदा सोमवार (दि. 19) ते शुक्रवार (दि. 23) पर्यंत द्वारयात्रा होणार आहे. शुक्रवारी सकाळी 5 ते 12 वाजेपर्यंत श्रींचे मुखद्वार दर्शन व जलस्नान घालण्यासाठी अपूर्व संधी भाविकांना प्राप्त होणार आहे. पहाटे मंगलमूर्ती पालखीचे आगमन झाल्यानंतर मुख्य पुजारी, बह्मवृंद यांच्याद्वारे पूजा केली जाणार आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उघडून भाविकांना जलाभिषेकाची संधी या कालावधीत होत आहे. या कालावधीत छबीना, पालखी मिरवणूक, धुपारती, महापूजा ही चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते होईल.
मयूरेश्वराच्या चार दिशांना चार पुरुषांत पूर्व द्वार(धर्म), दक्षिण द्वार (अर्थ), पश्चिम द्वार (काम), उत्तर द्वार (मोक्ष) अशी आहेत. या दिवसात गणेशभक्त चुकांचे परिमार्जन करण्यासाठी द्वार यात्रा अनुष्ठान करतात. पूर्व द्वार बाबुर्डी प्रतिपदा या दिवशी सुचिर्भुत होऊन भाविक संकल्प करतात. यासाठी 10 किलोमीटर चालत जावे लागते.
या कालावधीत या मार्गावरील देवतांचे दर्शन केले जाते. दुसरे द्वार दक्षिणद्वार हे मुर्टी मार्गावरील मंदिरात दर्शन घेऊन पुढे जावे लागते. हे द्वार 10 किलोमीटर अंतरावर आहे. पश्चिम द्वार नाझरे 20 किलोमीटर अंतरावर असून मोक्ष मंडप (उत्तर द्वार) हे वढाणे येथे असून ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. या द्वाराचे दर्शन अमावस्येच्या आदल्या दिवशी घ्यावे लागते. ग््राामपंचायतीमार्फत वाहनतळाची सोय करण्यात आली आहे.
भाविकांना गणेश कुंडामध्ये पाण्याची सोय केली जाईल. यात्रा कालावधीत सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज कुमार नवसरे व अंमलदार यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन केले जाते. मयूूरेश्वर मंदिराचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप व मनोज तावरे हे भाविकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात. सुरक्षा कर्मचारी भाविकांना योग्य ते सहकार्य करतात. सुरक्षा कर्मचारी पर्यवेक्षक शैलेश गायकवाड व सुरक्षा कर्मचारी भाविकांसाठी विशेष सहकार्य करीत असतात. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येते.