MNS Pune Municipal Election Pudhari
पुणे

MNS Pune Municipal Election: पुणे महापालिकेत मनसेचा उदय-अस्त : 28 वरून थेट 2 जागांपर्यंतचा प्रवास

पहिल्या यशानंतर घसरता आलेख; 2026 ची निवडणूक मनसेसाठी निर्णायक ठरणार?

पुढारी वृत्तसेवा

पांडुरंग सांडभोर

अल्प कालावधीत मिळालेले यश टिकवणे किती अवघड असते, याचा प्रत्यय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सलग तीन पुणे महापालिका निवडणुकीतील आकडेवारी पाहिली की येते. पहिल्या निवडणुकीत आठ आणि दुसऱ्या निवडणुकीत थेट 28 नगरसेवक निवडून येण्याचा विक्रम ज्या मनसेच्या नावावर नोंदला गेला, त्याच पक्षाला तिसऱ्या निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळविण्याची नामुष्की पत्कारावी लागली.

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या जनतेला या पक्षाच्या रूपाने एक नवीन पर्याय मिळाला. अवघा तरुण मतदार वर्ग ठाकरेंच्या मागे उभा राहिला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमू लागली अन्‌‍ महाराष्ट्रातही नवीन वारे वाहू लागले. पुण्यातही मनसेची लाट उसळली अन्‌‍ अवघ्या वर्षभरात झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने एक -दोन नव्हे तर तब्बल आठ जागा जिंकत आश्चर्याचा धक्का दिला. पहिल्याच झटक्यात मिळालेल्या या यशाच्या संधीचे आठही नगरसेवकांनी सोने केले. पुणेकरांच्या प्रश्नांवर महापालिकेच्या सभागृहात विविध अभिनव पध्दतीची आंदोलने करून पुणेकरांची मने जिंकली.

त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला. मनसे स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत खडकवासला विधानसभा निवडणुकीचा गड मनसेच्या रमेश वांजळे यांनी जिंकला. महाराष्ट्रातही तब्बल 13 आमदार या पक्षाचे निवडून आले. तर पुण्यात कसबा, कोथरूड या अशा काही विधानसभा मतदारसंघात तर मनसेने थेट दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली. मनसेचा हा झंझावात सुरू असतानाच पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महापालिकेने हटविला, त्याचे जोरदार पडसाद उमटले. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पुतळा हटविण्याच्या विरोधात आवाज उठवला. त्याचा थेट परिणाम 2012 च्या महापालिका निवडणुकीत दिसला. तब्बल 28 नगरसेवक या पक्षाचे निवडून आले. भाजप, शिवसेना या पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकत मनसेने थेट महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद पटकावले.

महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद आल्यानंतर पुणेकरांच्या प्रश्नांवर मनसे सभागृहात सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडेल असे वाटत असतानाच या पक्षाने मात्र प्रत्येक महत्त्वाच्या विषयात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. स्मार्ट सिटीसारख्या महत्त्वाच्या विषयात शेवटपर्यंत टोकाचा विरोध अन्‌‍ अखेरच्या क्षणी पाठिंबा अशी सगळी गोंधळाची परिस्थिती या पक्षाची सुरू होती. येथेच पक्षाला उतरती कळा लागली. त्यातच 2014 देशात अन्‌‍ राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आली. या लाटेत मनसेची वाट लागली. लोकसभेपाठोपाठ विधानसभेत या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. ही लाट महापालिकेत तडाखा देणार याची जाणीव झाली. मनसेच्या अनेक नगरसेवकांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे निवडणुकीआधीच मनसे दोन अंकी संख्या तरी गाठणार का प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. अन्‌‍ भीती खरी ठरली. मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 28 वरून या पक्षाची घसरण थेट 2 वर आली. शहरातील मनसेची अवस्था दयनीय झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सर्व जागांवर उमेदवारही उभे करता येऊ शकले नाहीत. मनसेचा हा घटता आलेख पुढेही कायम राहिला. आता 2026 च्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक तरी मनसेचे बुडते जहाज वाचवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT