Candidate Pudhari
पुणे

Maharashtra MLC Election Pune Candidates: विधानपरिषद निवडणुकीत पुण्याचा ‘पॉवर गेम’ रंगणार

महायुती-मविआकडून इच्छुकांची गर्दी; अनेकांना आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पुण्यातील महायुतीसह महाविकास आघाडीकडून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास ही निवडणूक पुण्यासाठी ‌‘पॉवर गेम‌’ ठरण्याची शक्यता असून, एकाच वेळी दोन ते तीन जणांना आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी दि. 12 मे रोजी निवडणूक होणार असून, त्यासाठी दि. 23 एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या नऊ जागांपैकी पाच जागा भाजप, दोन जागा शिवसेना, एक राष्ट्रवादी काँग््रेास आणि उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकेल, अशा पद्धतीचे संख्याबळ आहे.

भाजपकडे सर्वाधिक पाच जागा असल्या तरी, इच्छुकांची संख्याही तितकीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पुण्यातून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांचे नाव इच्छुकांमध्ये आघाडीवर आहे. आत्तापर्यंत प्रदेश सरचिटणीत्पया दावर काम करणाऱ्यांना पक्षाकडून संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पांडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो; याशिवाय विधानसभा निवडणुकीत महायुती झाल्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीपासून वंचित राहिलेले माजी आमदार जगदीश मुळीक हेसुद्धा इच्छुक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्यामुळे मुळीक यांना संधी देऊन मुख्यमंत्री या आश्वासनाची पूर्तता करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय जिल्ह्यात ताकद वाढविण्याचा निर्णय झाल्यास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचीही नावे पुढे येऊ शकतात.

शिवसेनेकडे असलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर पुण्यातील इच्छुकाला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. त्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर आहे. नुकत्याच राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली होती. विधानपरिषदेसाठी हेच तंत्र अवलंबल्यास अनपेक्षित नावही पुढे येऊ शकते; त्यात माजी आमदार व शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर तसेच डॉ. रोहित टिळक यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. याशिवाय, शिवसेना फुटीनंतर पुण्यातून सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेणारे शहरप्रमुख नाना भानगिरे हेही परिषदेवर संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीकडे एकच जागा असून, इच्छुक भरपूर आहेत. त्यामुळे पुण्याला संधी मिळणार का? याबाबत साशंकता आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यातील संघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यातच मित्रपक्ष भाजपने तीन मंत्रिपदे, राज्यसभा, विधानपरिषद, अशी अनेक पदे पुणे शहरासह जिल्ह्यात देऊन ताकद वाढविण्याचे काम सुरू ठेवले आहे. एकंदरीतच, आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुण्याला आमदारांचा मोठा डोस मिळण्याची अधिक शक्यता आहे.

राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याला बळ देण्याच्या तयारीत

आगामी काळातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही पुण्यातील इच्छुकांचा विचार केला जाऊ शकतो. या इच्छुकांमध्ये शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, माजी शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधून नगरसेवक नाना काटे, योगेश बहल यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. आगामी काळात संघटनेला ताकद देऊन सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या इच्छुकांचा पक्षाकडून विचार होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

...तर शिवसेनेकडून सुषमा अंधारेंचा विचार होऊ शकतो

महाविकास आघाडीकडील एक जागा शिवसेना ठाकरे पक्षाला मिळू शकते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा परिषदेवर जाण्याचा निर्णय न घेतल्यास या जागेसाठी पुण्यातून पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अंधारे आक्रमक पद्धतीने परिषदेत पक्षाची भूमिका मांडू शकतात, त्यामुळे त्यांच्या नावाला अधिक पंसती मिळू शकते, असेही सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT