पुणे: धोरणनिर्मिती, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेतील गुंतागुंत समजून तरुणांनी राजकीयदृष्ट्या कुशल, प्रशासन जाणकार आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील बनविण्यासाठी कॅम्पसमधूनच एक नवी पिढी निर्माण होऊ शकते. राजकारणाला शुद्ध करण्यासाठी नवीन आणि सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात प्रवेश करावा, असे आवाहन लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केले.
एमआयटीतर्फे 15 व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी आणि राज्यसभा खासदार डॉ. संदीप कुमार पाठक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण याबरोबरच केवळ एआय नैतिकतेची उपेक्षा करू शकत नाही. 21 व्या शतकात कॅम्पसमधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर एआय नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजे. गेल्या 10 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग््रा बदल घडला आहे. यामध्ये आयआयटी, आयएमएम, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या संख्येत वृद्धी झाली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी सेमी कंडक्टर, हेल्थकेअर व अन्य क्षेत्रातील अतुलनीय वृद्धी होत आहे. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वत:ला सशक्त बनवा!
शाहिद सिद्दीकी म्हणाले, विश्वगुरू बनण्यासाठी युवकांनी स्वतःला सशक्त बनवा. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू नये. युवकांनी केलेल्या आंदोलनामुळेच या देशात परिवर्तनाची लाट आली आहे. त्यात जेपी मूहमेंटसारख्या अनेक चळवळीचा सहभाग आहे. युवकांनी जाती-पातीच्या भिंती तोडून देशविकासासाठी कार्य करावे. देशाला बदलायचे असेल तर सर्वात प्रथम युवकांनी मानसिकता बदलावी.
भष्टाचार, जातीयवाद, जमातवाद दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा आहे.डॉ. राहुल विश्वनाथ कराड, संस्थापक, छात्र संसद