सुनील जगताप
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत जाहीर केलेली कुस्ती निवासी योजना म्हणजे कुस्तीगीरांच्या प्रगतीऐवजी अधोगतीचा ‘तुघलकी’ मार्ग असल्याची तोफ ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघा’ने डागली आहे. त्यामुळे या ’मिशन लक्ष्यवेध’ संकल्पनेला कुस्तीगीर संघाने चॅलेंज दिले असून, त्यावर काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागले आहे.
कुस्तीगीर संघाने क्रीडा विभागाला निवेदन दिले असून, त्यामध्ये 10 वजन गटांत केवळ 20 कुस्तीगीर निवडणे म्हणजे कुस्तीचा पायाच मोडीत काढण्यासारखे आहे. सरावादरम्यान 15 ते 20 टक्के खेळाडू नेहमीच दुखापतग््रास्त असतात. अशा वेळी मोजकेच खेळाडू राहिल्यास सराव जोडीदाराअभावी पैलवान तयार होणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ही योजना केवळ ‘फ्रीस्टाईल’ कुस्तीसाठी असून ‘ग््राीको रोमन’ आणि महिला कुस्तीगीरांना वाऱ्यावर सोडले आहे. क्रीडा विभागाने आपला ‘मनमानी’ कारभार न थांबवल्यास कुस्तीगीर संघाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा कार्यालयांसमोर ‘थाळीनाद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, याबाबत क्रीडा विभागाने ही योजना उत्तम असून, कुस्तीगीर संघाला पुन्हा एकदा ही योजना समजून सांगण्याची भूमिका घेतली आहे.
क्रीडा विभागाला कुस्तीगीर संघाच्या वतीने दोन-तीन आठवड्यांपूर्वीच निवेदन दिले असून, गेल्या आठवड्यात आयुक्तांची भेट ही घेतली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाले असून, अद्याप बैठकीचा निरोप आलेला नाही.संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत कुस्तीसाठीची ही योजना उत्तम आहे. त्यामध्ये असलेल्या तरतुदी आणि नियम याबाबत कुस्तीगीर संघाला पुन्हा एकदा अवगत करून दिले जाईल. त्यांचे क्रीडा विभागाला पत्र मिळाले. संघासमवेत बैठक घेऊन आम्ही चर्चा करणार असून, त्यावर योग्य तो तोडग काढू.सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय