‌Tukaram Mundhe News Pudhari
पुणे

Maharashtra Milk Adulteration Action: दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा कडक इशारा; भेसळखोरांना कठोर कारवाईचा इशारा

राज्यात दुधातील भेसळ पूर्णपणे थांबवण्याचा निर्धार; एफडीएकडून दूध संस्थांना कडक सूचना व नियमांचे पालन अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात दुधातील भेसळीचे समूळ उच्चांटन झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर आणि ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध दूधपुरवठा व्हायला पाहिजे. दुधामध्ये भेसळीचा एकही थेंब सापडता काम नये अथवा त्यामध्ये भेसळीचा कोणताही घटक आढळता कामा नये.

त्यामुळे कायदेशीर बाबी तपासून आणि सावधानता बाळगून दूध संस्थांनी संकलनास प्राधान्य द्यावे; अन्यथा भेसळखोरांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत दूध संस्थांना दिल्याचे सांगण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्व‍पूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सहकारी व खासगी मिळून एकूण ९० दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा आणि प्रत्यक्षात दूध संस्थांचे होणारे व्यवहार, यामधील प्रत्यक्ष तफावतीबाबतचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. त्यावर दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी अडचणीही मांडल्या. दूध संस्थांनी ठिकठिकाणी होणाऱ्या दूधसंकलनावेळी घ्यावयाची काळजी व पुढील काळामध्ये दुधामधील भेसळीचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आणि कृतीची गरज असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केल्याची माहिती बैठकीनंतर उपस्थित दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली.

बैठकीत मुंढे यांनी मांडलेले मुद्दे:

  • अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गरज असेल, तेथे तालुकास्तरावर येऊन कायदेशीर माहिती देतील.

  • जे चांगले काम करतात, त्यांना विभागाचे उत्तम सहकार्य मिळेल. त्यांना जाणूनबुजून अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यास माझ्याशी संपर्क साधावा.

  • भेसळ आढळल्यास कारवाई होणारच; त्यांना माझ्याकडे यायची गरज नसून कारवाईला सामोरे जावे लागेल.

  • दुधातल्या भेसळीचा कलंक पुसून टाकण्यासाठी आम्ही दूध संस्थांबरोबर काम करू आणि महाराष्ट्रात दुधातील भेसळीचे उच्चाटन करू!

  • दुधापासूनचे शुद्ध पनीरच ग्राहकांना मिळण्यासाठी काम केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT