पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतरावर मेट्रो 6 मार्च 2022 ला सुरू करण्यात आली. मात्र, स्टेशनची अपूर्ण स्थितीतील कामे पूर्ण करून फुगेवाडीच्या पुढे मेट्रो धावण्यास तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागला आहे. त्यामुळे महामेट्रोचे काम कासवगतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्चला पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांनी ऑनलाइन उद्घाटन केले. सुरुवातीला उत्सुकता म्हणून नागरिकांनी मेट्रो सफरीचा आनंद लुटत भरपूर प्रतिसाद दिला. मात्र, दोन ते तीन महिन्यांत मेट्रोची उत्सुकता व नवलाई घटली. अनेक महिन्यांपासून मेट्रो रिकामीच धावत आहे.
मेट्रो सुरू झाल्याने उर्वरित कामे वेगात पूर्ण करण्यावर महामेट्रोने भर दिल्याचा दावा केला होता. मात्र, दीड वर्ष होत आले, तरी अद्याप कामे अपूर्ण स्थितीत आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंत मेट्रो नागरिकांसाठी खुली करण्याचे महामेट्रोने अनेक मुहूर्त दिले होते. प्रथम डिसेंबर 2022, नंतर जानेवारी 2023, त्यानंतर मार्च 2023 आणि मे 2023 असे मुहूर्त देण्यात आले होते. मात्र, स्टेशनची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. नाशिक फाटा, दापोडी, बोपोडी, खडकी या स्टेशनची कामे अद्याप सुरूच आहेत.
पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो धावत असून, त्यापुढे जात नसल्याने नागरिकांनी मेट्रो प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. मेट्रो पुणे शहराशी जोडली न गेल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. प्रवाशांअभावी मेट्रोचे मोठे नुकसान होत आहे. अखेर सुमारे दीड वर्षानंतर येत्या मंगळवारी (दि. 1) पिंपरी ते सिव्हिल कोर्ट तसेच रुबी हॉल व कोथरूड, वनाजपर्यंतच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पुणे शहराशी जोडले जाणार आहे.
पिंपरी ते सिव्हिल कोर्ट
पिंपरी ते रुबी हॉल
पिंपरी ते वनाज, कोथरूड
परवानगीनंतरच मेट्रो प्रवासी वाहतूक
खडकी येथील जागा संरक्षण विभागाकडून महामेट्रोच्या ताब्यात येण्यास विलंब झाला. त्या पट्ट्यातील काम उशिराने सुरू झाले. मात्र, तेथील कामे विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून मेट्रो वाहतुकीस परवानगी मिळणे आवश्यक होते. त्यांनी तीनही मार्गांवर चाचण्या घेऊन आवश्यक परवानगी दिली आहे. त्यानंतर हे नवीन तीन मार्ग नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहेत, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
हेही वाचा