

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने चालू 2023-24 आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 29 जुलै या चार महिन्यांतच विक्रमी 500 कोटी रुपयांची मिळकतकर वसुली केली आहे. गेल्या वर्षी केवळ 287 कोटींची वसुली झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 210 कोटींनी जास्त कर भरणा झाला आहे. त्यावरून करवसुलीच्या हा पीसीएमसी पॅटर्न यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने एक पॅटर्न सुरू केला आहे. त्यानुसार, डेटा अॅनालिटिक्स, सोशल मीडिया जनजागृती, विविध स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी प्रोत्साहन देणे. गेल्या पाच वर्षापासून मिळकतकर न भरलेल्यांची यादी करून त्यांना जप्तीची नोटीस देणे, त्यांच्यावर जप्ती कारवाई करणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग व एसएमएस करणे, सिद्धी प्रकल्पातून शंभर टक्के बिलांचे वाटप आदींवर भर दिला जात आहे.
कर्मचार्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कर वसुलीचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे सुरुवातीच्या चार महिन्यांत 3 लाख 29 हजार 470 मिळकतधारकांनी तब्बल 500 कोटींचा कर भरला आहे. त्यात निवासी 2 लाख 91 हजार 91 मिळकती आहेत. औद्योगिक 2 हजार 434, बिगरनिवासी 26 हजार 289, मिश्र 7 हजार 625, मोकळ्या जमिनी 2 हजार 326 आणि इतर 3 मिळकतींचा समावेश आहे. मिळकतधारकांनी कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे.
अन्यथा थकबाकीदारांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान मिळण्यासाठी केंद्राने मिळकतकर कर सुधारणा सुचवलेल्या आहेत. पालिकेने केलेला रोडमॅप आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथील कार्यशाळेत सादर केला. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आयोगाचे अनुदान मिळणार आहे.
वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून करसंकलन विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांचासुद्धा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांच्याकडून कर वेळेवर भरण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचे करवसुलीचे एक हजार कोटींचे उद्दीष्ट असून ते नक्की पूर्ण होईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
ऑनलाईन 322 कोटी 86 लाख
विविध अॅप 5 कोटी 73 लाख
रोख 61 कोटी 12 लाख
धनादेश 44 कोटी 41 लाख
इडीसी 4 कोटी 91 लाख
आरटीजीएस 24 कोटी 51 लाख
हेही वाचा