पुणे: मिथेनॉल अर्थात मिथील अल्कोहोल हे विषारी द्रावण असून, ते प्राशन करताच प्रथम रुग्ण ‘वातभम’ (डेलेरियम स्ट्रेमेन्स) स्थितीत जातो. त्याला दिवस-रात्रीतला फरक ओळखणे कठीण होते. दृष्टी कमजोर होऊ लागते आणि मग हृदय, किडनीवर विपरीत परिणाम होऊन मद्यपीचा काही वेळात मृत्यू होतो.
मिथेनॉल हे मुळात विष आहे. त्याचा गुणधर्म विषारी आहे. दारूची तीवता (पोटेन्सी) वाढविण्यासाठी ते टाकतात (दारुड्यांच्या भाषेत त्याने जोरदार किक बसते.) मात्र, ते विष असल्याने प्रथम मेंदू निकामी होऊ लागतो. त्यानंतर दृष्टी धूसर होत अंधत्व येते. हृदय बंद पडू शकते, किडनीसह सर्वंच अवयवांवर काही मिनिटांत त्याचे दृश्य परिणाम दिसतात. पाचवेळा तरुण जागतिक मेंदुविकारतज्ज्ञ म्हणून पुरस्कार मिळवणारे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. रश्मीन आचलिया यांनी खास ‘पुढारी’शी या विषयावर संवाद साधला. विषारी दारूमुळे शरीरात नेमके काय होते? हे त्यांनी शास्त्रीय भाषेत सांगितले.
‘वातभम’ म्हणजे काय?
दारूच्या अतिसेवनामुळे डेलेरियम स्ट्रेमेन्स अर्थात वातभम होतो. यात छातीत धडधडणे, हात-पाय थरथरणे, उलट्या होणे, दिवस-रात्र यातील फरक न कळणे, जवळच्या व्यक्तींचाही विसर पडणे, ही लक्षणे दिसतात.
मिथेनॉल शरीरात गेल्यावर काय होते?
मिथेनॉल हे औद्योगिक अल्कोहोल आहे. ते पिण्यासाठी सुरक्षित नसून विषारी आहे. त्यामुळे यकृतात गेल्यावर त्याचे रूपांतर फॉर्मल्डिहाईड आणि फॉर्मिक ॲसिडमध्ये होते. ही दोन्ही द्रव्ये अत्यंत विषारी आहेत.
फॉर्मिक ॲसिडमुळे रक्तच आम्लयुक्त होते.
मेंदूच्या पेशींचे झपाट्याने नुकसान होऊ लागते.
डोकेदुखी, चक्कर, गोंधळल्यासारखे वाटू लागते.
रुग्ण गंभीर अवस्थेत (कोमात) जातो.
वेळेवर उपचार न मिळाल्यास तत्काळ मृत्यू होतो.
डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊन दृष्टी जाते. प्रथम धूसर दिसू लागते, प्रकाशाभोवती वर्तुळे दिसू लागतात.
फॉर्मिक आम्लदृष्टी चेतातंतूला गंभीर नुकसान पोहचवतात.
नियमित अतिदारूचे व्यसन हे वाईटच.अतिदारी प्यायल्याने वातभम होतो. अशा रुग्णाला उपचारांनी वाचवणे शक्य आहे. मात्र, विषारी दारू प्यायला असेल, तर उपचारांसाठी निरीक्षणासाठी वेळ कमी मिळतो. उपचार सुरू करण्याआधीच रुग्ण दगावू शकतो, इतके मिथेनॉल विषारी आहे.डॉ. रश्मीन आचलिया, मेंदुविकारतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर