

पुणे: युद्धजन्य परीस्थितीमुळे वाढलेले पेट्रोल-डिझेलचे भाव आणि उन्हाचा वाढता चटका यामुळे यंदा शाळा उशिरा सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच, शाळा ऑनलाइन सुरू करण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. परंतु, असे काहीही न होता यंदा 15 जूनपासूनच शैक्षणिक वर्षांचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी सुरू झालेली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा 15 जूनपासूनच करण्यात येणार आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, शाळादेखील पारंपरिक पद्धतीनेच ऑफलाईन सुरू होणार आहेत. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर योग्य निर्णय घ्यायचा आहे.
परंतु, विदर्भ, तसेच इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू करण्यात याव्यात. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता 15 जून ते 29 जून या कालावधीत सकाळी 7 ते 11.45 या वेळेत सुरू करण्यात याव्यात, 30 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा शालेय शैक्षणिक वर्ष 15 जूनपासूनच पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये बदल करण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत. शाळा ऑनलाईन घेण्याचे किंवा उशिरा सुरू करण्याचे सध्या तरी कोणतेही नियोजन नाही
शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय