पुणे

विश्वासाच्या नात्यातून घेतला जातो वैद्यकीय सल्ला

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : फॅमिली डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्यामुळे घराजवळील फॅमिली डॉक्टरकडेच उपचारासाठी जाण्यावर अद्यापही बर्‍याच जणांचा भर आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना काळ बदलला तरी अद्याप टिकून आहे. बर्‍याच जणांना ठराविक डॉक्टरचाच गुण येत असल्याने ते ठरलेल्या डॉक्टरकडेच वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जातात. त्यातही विशेषतः सर्दी, खोकला, ताप अशा छोट्या आजारांसाठी आपल्या फॅमिली डॉक्टरकडेच जाण्याचा बर्‍याच जणांचा कल असतो. तथापि, आजाराचे स्वरुप गंभीर असल्यास अशा परिस्थितीत मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो.

घराजवळील डॉक्टरला प्राधान्य

छोट्या आजारांसाठी बरेच जण घराजवळील डॉक्टरकडेच जाणे पसंत करतात. त्यासाठी महागडे उपचार रुग्ण नाकारतात. काही कुटूंब दोन-दोन पिढ्या एकाच डॉक्टरांकडे उपचार घेत असल्याचे पाहण्यास मिळते. छोट्या-छोट्या आजारांसाठी म्हणजे सर्दी, खोकला, ताप आदींसाठी मोठे रुग्णालय गाठणे किंवा महागडे उपचार घेणे बर्‍याचदा टाळले जाते.

गंभीर आजारांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला

गंभीर स्वरुपाच्या आजारांमध्ये मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. फॅमिली डॉक्टर अशा परिस्थितीत रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. रुग्ण त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय उपचार घेतात. पूर्वी घरी येऊनही फॅमिली डॉक्टर हे उपचार करत होते. सध्या फॅमिली डॉक्टरचे घरोघरी जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णांनाच उपचारासाठी बर्‍याचदा दवाखाना गाठावा लागतो. मात्र, काही तातडीची परिस्थिती उद्भवल्यास फॅमिली डॉक्टर आजही वेळप्रसंगी घरी येऊन उपचार करतात.

फॅमिली डॉक्टर रुग्णाच्या कुटुंबाचा एक घटक झालेला असतो. त्यांना रुग्णाच्या आजाराचा पुर्व इतिहास माहिती असतो. एखादा छोटा आजार असेल तर घराजवळ असणार्‍या फॅमिली डॉक्टरकडेच जाण्यावर बरेच जण अद्यापही भर देतात. या डॉक्टरांविषयी त्यांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण झालेले असते. आजार जर गंभीर असेल तर, अशा परिस्थितीत रुग्ण आपल्या फॅमिली डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेऊन त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडे किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जातात.

– सायली तुळपुळे, एमडी, मेडिसीन

फॅमिली डॉक्टरांचा रुग्णांशी जुना स्नेहबंध असतो. घरापासून जवळ असलेल्या डॉक्टरकडेच जाणे बरेच जण पसंत करतात. त्यांना ते सोयिस्कर पडते. त्याशिवाय, फॅमिली डॉक्टरना रुग्णांची गरज असल्याने ते अवाजवी शुल्क आकारत नाही. जास्त वेळा रुग्णसेवा देतात. त्याचप्रमाणे, रुग्णाच्या मनातील आजाराची भीती घालविण्यासाठी रुग्णांना दिलासा देण्यावर त्यांचा भर असतो.

– डॉ. सुभाष कुलकर्णी, फिजिशियन

हेही वाचा

SCROLL FOR NEXT