Pune Municipal Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: मयूर कॉलनी–कोथरूड प्रभागात भाजपचा क्लीन स्वीप

रणनीती, उमेदवार निवड आणि पक्षप्रवेशाचा फायदा; चारही जागांवर भाजपचा मोठ्या मताधिक्याने विजय

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाग असलेल्या मयूर कॉलनी- कोथरूड (प्रभाग क्रमांक 31) या प्रभागात चारही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपने आखलेल्या रणनीतीचा थेट फायदा पक्षाला झाला. माजी शिवसैनिक पृथ्वीराज सुतार यांना पक्षात घेतल्याने भाजपचे पॅनल मजबूत झाले. तसेच, संघाचा चेहरा असलेल्या ज्योत्स्ना कुलकर्णी यांना ऐनवेळी तिकीट दिल्याने 2017 मध्ये झालेल्या मतांचे विभाजन या वेळी टळले. यामुळे भाजपचे चारही उमेदवार या वेळी निवडून आले. मोठा नेता भाजपमध्ये गेल्याने शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेची जादू या वेळी चालली नाही. मतदारांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना नाकारले व भाजपला मतदान केले.

मयूर कॉलनी- कोथरूड प्रभागात भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रभाग रचना करताना अनेक बदल या प्रभागात करण्यात आले होते. या प्रभागात भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी व संघाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचून संपूर्ण कोथरूड विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणुकीपूर्वीच तयारी सुरू केली होती.

2017 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह हर्षाली माथवड, वासंती जाधव हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागात भाजपची ताकद सर्वाधिक असली, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग््रेास यांची देखील या प्रभागात ताकद आहे. आरक्षण सोडतीत प्रभागातील ‌‘अ‌’ गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. ‌‘ब‌’ गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला होता. ‌‘क‌’ गट हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. तर ‌‘ड‌’ गट हा सर्वसाधारण म्हणून राखीव होता.

या आरक्षणाच्या आधारावर विरोधकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी स्थानिक नेते पृथ्वीराज सुतार यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे उद्धव ठाकरे गटाचा मोठा नेता गळाला लागल्याने भाजपचे पॅनल मजबूत झाले. घराणेशाहीचा शिक्का लागू नये म्हणून उमेदवारीमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे नीलेश कोंढळकर व दुष्यंत मोहोळ यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी संघाचे तसेच भाजपचे निष्ठावान असणाऱ्या ज्योत्स्ना कुलकर्णी यांना तिकीट देण्यात आले. तसेच हर्षाली माथवड यांच्या ऐवजी दिनेश माथवड यांना उमेदवारी देण्यात आली. तर, वासंती जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. या चारही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.

शिवसेना-मनसेला आत्मचिंतन करण्याची गरज

मयूर कॉलनी- कोथरूड प्रभागात एकेकाळी शिवसेना आणि मनसेची मोठी ताकद होती. यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना- मनसे अशी लढत पाहायला मिळाली. पृथ्वीराज सुतार यांच्यासारखा मोठा नेता भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली. शिवसेना व मनसे यांनी आपले दोन-दोन उमेदवार या प्रभागातून उभे केले होते. योगेश मोकाटे, प्रज्ञा लोणकर हे शिवसेनेचे, तर सुप्रिया काळे व किशोर शिंदे हे मनसेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकत्र लढूनही या दोन्ही पक्षांची जादू या वेळी चालली नाही. त्यामुळे या प्रभागातील उरलेली ताकद क्षीण झाल्याने दोन्ही पक्षांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT