पुणे : पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना आवश्यक असून, गोयल समितीचा अहवाल राज्य शासनाला मार्गदर्शक ठरेल. लवकरच या अहवालाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासमोर सादरीकरण करून अहवाल अंतिम केला जाईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.(Latest Pune News)
राज्यातील पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना व सक्षमीकरण करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी सुधीर कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर केला आहे. शुक्रवारी (दि. 19) तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत रावल यांच्यासमोर डॉ. सुधीर कुमार गोयल समितीने त्या अहवालाचे सादरीकरण केले.
या वेळी समितीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी सुधीर कुमार गोयल, माजी अतिरिक्त सचिव (कृषी व पणन) उमाकांत दांगट, माजी पणन संचालक सुनील पवार, संचालक विजय लहाने, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.
मंत्री रावल पुढे म्हणाले की, गोयल समितीने अहवाल तयार करताना विविध अंगानी अभ्यास केला आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून पणन विभाग पुढे जात आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर करण्यासाठी ग्रामीण बळकट होणे आवश्यक आहे. पणन व्यवस्था बळकट झाल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल. यासाठी गोयल समितीचा अहवाल मार्गदर्शक ठरेल,असे ते म्हणाले.
पुढील पंधरा दिवसांत अहवालाचे बारकाईने परीक्षण करून आवश्यक शिफारसी केल्या जातील. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत या अहवालाचे सादरीकरण करून अंतिम केला जाईल, या अहवालाच्या अंमलबजावणीमुळे कृषी मूल्यसाखळी अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक दर मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या वेळी समितीचे अध्यक्ष सुधीरकुमार गोयल यांनी अहवालाच्या संदर्भात माहिती दिली. समितीच्या कामकाजादरम्यान 13 बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
...असा तयार झाला अहवाल
या अहवालामध्ये एकूण 15 प्रकरणे असून, पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना, सबलीकरण आणि सक्षमीकरण यावर सविस्तर शिफारसी करण्यात आल्या आहेत.
पुनर्रचनाबाबतचा विचार करताना मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र संवर्ग निर्माण करणे, पणन महासंघ, वखार महामंडळ, कापूस पणन महासंघ, ग्राहक महासंघ यांची पुनर्रचना, मूल्यसाखळी आधारित पणन व्यवस्था अशा विविध अंगाने अभ्यास करण्यात आला आहे
शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यातक्षम बनवून त्याचे उत्पन्न कसे वाढवता येईल, या अनुषंगाने पणन विभागाचे प्रयत्न चालू असल्याचे गोयल यांनी सांगितले.