

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष ऊर्फ कुमार नामदेव गायकवाड यांनी कामकाजात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 39 (1) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यामुळे संतोष गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(Latest Pune News)
संतोष गायकवाड हे 9 फेबुवारी 2021 पासून वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर कार्यरत आहेत. संतोष गायकवाड व तत्कालीन ग्रामसेवकांनी संगनमताने 9 फेबुवारी 2021 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत कर्तव्यात कसूर करीत अपहार केल्याचा तक्रार अर्ज ग्रामपंचायतीचे सदस्य हर्षवर्धन अर्जुन गायकवाड व इतर दहा सदस्यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेकडे दाखल केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात आली.
17 जुलै, 31 जुलै व 7 ऑगस्ट 2025 रोजी सुनावणी झाली. या चौकशीचा अहवाल आला आहे. यामध्ये सरपंच संतोष गायकवाड यांनी कामकाजात हलगर्जीपणा, दुर्लक्ष, आर्थिक व प्रशासकीय अनियमितता, नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाज करून कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अहवालात म्हटले आहे. सरपंच संतोष गायकवाड यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.
याबाबत सरपंच संतोष गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वालचंदनगर ग्रामपंचायतीचा कारभार शासकीय नियमाप्रमाणे पारदर्शक पध्दतीने केला आहे. कामकाजात कोठेही अनियमिता नाही. मात्र, प्रशासनावर राजकीय दबाब आणून कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविल्याचा आरोप केला.