

पुणे : ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या विविध क्रीडा संघटनांना पंचवार्षिक निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. या सर्व क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा. हा अधिकार दिला गेला नाही तर खेळाडूंसह राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.(Latest Pune News)
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (एमओए) चे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी एमओएच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस, कार्याध्यक्ष संदिप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सल्लाउद्दीन अन्सारी, सचिव संदिप गाडे, क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे, राष्ट्रीय तालीम कुस्ती संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे, मिलिंद पठारे यांसह तायक्वांदो, कराटे, कुस्ती आदि खेळातील पदाधिकारी, आणि खेळाडू उपस्थित होते.
तडस म्हणाले, एमओएचे महासचिव राज्यातून खेळ संपविण्याचे मागे लागलेले आहेत. सर्वच खेळांच्या संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. दि. 25 सप्टेंबरच्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत निर्णय घेतला गेला नाही तर दि. २७ सप्टेंबर पासून राज्यभर खेळाडूंसह तीव्र आंदोलन करु.
भोंडवे म्हणाले, कुस्ती खेळात संघटनांचा वाद असला तरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला राष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे. संघाच्या वतीने एमओएच्या मान्यतेसाठी अर्ज दाखल करुनही अद्याप मान्यता दिलेली नाही. संघटनेवर स्वतःची सत्ता आणण्यासाठी २२ क्रीडा संघटनांनाच मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या संघटनांवरही महासचिवांचे नातेवाईक नाही तर त्यांची माणसे असलेल्या संघटना असल्याचा आरोप ही भोंडवे यांनी यावेळी केला.
दोडके म्हणाले, राज्यात खेळाडू खेळामध्ये प्रगती करीत आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असताना ही दुसऱ्या बाजुला मात्र एमओएचे महासचिव मनमानी कारभार करीत आहेत. संघटनांच्या मान्यतेबाबत वारंवार मागणी करुन ही जाणीवपुर्वक त्यांनी संघटनांना मान्यता दिलेली नाही. सर्वच संघटनांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे.
सल्लाउद्दीन अन्सारी म्हणाले, एमओएने 2022 ला गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांच्या खर्चाचा तपशील शासनाने सादर केलेला नाही. याबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करुन ही तीन वर्षात माहिती दिलेली नाही. अनेक संघटनांच्या मान्यतेचा विषय ही प्रलंबित ठेवण्यात आला असून अशा व्यक्तींना एमओए सारख्या संघटनांपासून लांब ठेवणे आवश्यक आहे.
खेळाडूंनी असे आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणे ही क्रिडा क्षेत्रासाठी शोकांतिका म्हणावी लागेल. काही मंत्री व भ्रष्ट पदाधिकारी त्या खेळाडूंच्या स्वप्नाशीच खेळ करतात आणि खेळाडूंचे भवितव्य उध्वस्त करतात. अशा पदाधिकाऱ्यांना तत्काळ पदमुक्त करून खेळ व खेळांचे भवितव्य अबाधित राखावे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही संघटना माहिती अधिकार कक्षेत यायला पाहिजे. ज्यामुळे त्यांचे खरे रूप जगासमोर येईल आणि खऱ्या खेळाडूंना त्यांचा न्याय हक्क मिळेल.
लतेंद्र भिंगारे (अध्यक्ष, क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य)
माजी खासदार रामदास तडस यांनी पत्रकारांशी बोलताना केलेले सर्व आरोप खोटे आहेत. गेल्या पाच वर्षांज सलग ३ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिला आहे. सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅटट्रिकचा विक्रम महाराष्ट्राने केला आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन बाबत खेळाडूंची एकही तक्रार नाही. मात्र तथाकथित वादग्रस्त क्रीडा संघटकांनी वैयक्तिक आकासापोटी खोटे आरोप केले आहेत. याचाचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निषेध करीत आहे.
नामदेव शिरगांवकर