बावडा : इंदापूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी दिवाळी सण लक्षात घेऊन नियोजनपूर्वक झेंडू पिकाची लागवड केली आहे. सध्या झेंडू फुलांना चांगला दर मिळत असल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दिवाळी सणासाठी झेंडू उत्पादक शेतकरी सज्ज झाला आहे.(Latest Pune News)
सध्या अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये स्वतंत्रपणे ऊस, फळबागा व इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूचे पीक घेतले आहे. दसऱ्याला झेंडूला साधारणत: प्रतिकिलो 100 रुपये भाव मिळाल्याने झेंडू उत्पादक शेतकरी आनंदी दिसत आहे.
भोडणी (ता. इंदापूर) येथील प्रगतशील शेतकरी संतोष नाना जगताप यांनी एक एकर क्षेत्रातील ऊस पिकामध्ये झेंडू पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. एक एकर क्षेत्रासाठी त्यांनी सुमारे 6 हजार 500 रोपे लावली. ऊस पिकामध्ये 5 फूट पट्ट्यामध्ये झेंडूच्या रोपांची लागवड महिला शेतमजुरांकडून केली आहे.
ऊस पिकामध्ये झेंडूचे पीक आंतरपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे संतोष जगताप व धनश्री जगताप या शेतकरी दाम्पत्याने सांगितले. दरम्यान, दिवाळी सणामुळे झेंडूला प्रतिकिलो 100 रुपयांपेक्षा अधिकचा भाव अपेक्षित असल्याचे संतोष जगताप यांनी सांगितले.