इंदापूर / भिगवण : पर्यावरण व मानवासाठी घातक मानल्या गेलेल्या थाई मांगूर मासे पालन व विक्रीवर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असतानाही इंदापूर तालुक्यात त्यांचे बेकायदेशीर पालन सुरू असल्याचे आढळले, त्यानुसार कालठण नंबर 1 येथे पुणे मत्स्यव्यवसाय विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, जलसंपदा व इंदापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल 2.4 टन मांगूर मासे जप्त करून नष्ट केले.
गुरुवारी (दि. 27) ही कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव यांच्या शेतातच हे मांगूर पालन होत होते. याप्रकरणी त्यांचे भाऊ संदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही या महिन्यात दोन कारवाया झाल्या असून, मांगूर शेतीचे समूळ उच्चाटन होईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालठण नंबर 1 मधील गट क्रमांक 76/5 व 74/2 मधील शेततलावांत हे मासे आढळले. मागील सूचना दिल्यानंतरही पालन थांबवले गेले नसल्याने पुणे मत्स्यव्यवसाय विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, जलसंपदा व इंदापूर पोलिसांनी थेट कारवाई केली. तलावातील माश्यांची पाहणी केल्यानंतर ते प्रतिबंधित थाई मांगूर असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर 2400 किलो मासे जेसीबीद्वारे खड्डा करून तांत्रिक पद्धतीने पुरून टाकण्यात आले. फिर्याद मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र राठोड यांनी दिली.
या कारवाईत सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राठोड, तुषार वाळुंज, दीपाली गुंड, गजानन काटे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उन्मेष काटवटे व त्यांचे सहकारी तसेच भास्कर घोळवे, मनोज पवार, पूनम जावळे व इंदापूर पोलिसांचे कर्मचारी सहभागी होते.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मांगूर पालनाचे जाळे सर्वाधिक असून, राजकीय पाठबळामुळे हा बेकायदेशीर व्यवसाय वाढला आहे. याबाबत दैनिक ’पुढारी’ने सातत्याने आवाज उठवला होता. अखेरीस संबंधित विभागांकडून सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. कायद्याचा हातोडा मजबूत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगत लवकरच ’मांगूरमुक्त उजनी’ करण्याचा विश्वास व्यक्त केला.