मंचर : नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षात बंडखोरी झाली आहे. शुक्रवारी (दि. 21) अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगरसेवकपदासाठी 16 प्रभागांमध्ये 67 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजपा युतीचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला.
मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून मोनिका सुनील बाणखेले, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने राजश्री दत्तात्रय गांजाळे, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने रंजनीगंधा राजाराम बाणखेले, कॉंग्रेस आयचे फरजीन इकबाल मुलाणी, अपक्ष जागृती किरण महाजन यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले.
प्रभाग क्रमांक 1 मधून शिल्पा अमोल काजळे यांनी माघार घेतल्यामुळे वंदना कैलास बाणखेले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 2, 3, 5, 6, 10, 12, 14, 16 या आठ प्रभागांत कोणीही माघार घेतली नाही. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अजिंक्य आनंद थोरात, अतीश अशोक थोरात तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनिकेत शिवाजी देठे, प्रभाग क्रमांक 8 मध्ये मन्सूर मोहम्मद शेख, कुमेल इनामदार, श्याम शांताराम थोरात यांनी माघार घेतली.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये आरशिया कुमेल इनामदार, जागृती किरण महाजन, प्रभाग क्रमांक 11 मध्ये परशुराम ज्ञानेश्वर भेके, प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुप्रिया ज्ञानेश्वर लोखंडे, तनजीला फरीद इनामदार, प्रभाग क्रमांक 15 मध्ये रूपाली इंद्रजित दैने तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये अर्चना शिवाजी थोरात, तृप्ती धनेश थोरात या उमेदवारांनी माघार घेतली. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग 1 बिनविरोध झाल्याने उर्वरित 16 प्रभागांमध्ये चुरस वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी सहा आणि नगरसेवकपदासाठी 67 उमेदवारांमध्ये तीव चुरस होण्याची चिन्हे आहेत.
मंचर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि भाजपा यांची युती झाली आहे. शिवसेना (शिंदे) स्वतंत्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) यांची आघाडी आहे. काँग्रेस आय पक्ष आणि आम आदमी यांची आघाडी झाल्याचे सांगण्यात आले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या स्नुषा प्राची आकाश थोरात, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या तालुकाध्यक्षा जागृतीताई महाजन यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विकास कांताशेठ बाणखेले यांच्या पत्नी डॉ. सोनाली विकास बाणखेले यांनी प्रभाग 14 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार व माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या स्नुषा वंदनाताई कैलासराव बाणखेले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे.