Coriander Pudhari
पुणे

Manchar Vegetable Price: मंचर बाजारात कोथिंबीर-मेथीचे विक्रमी दर; पावसामुळे आवक घटली, शेतकऱ्यांना दिलासा

संततधार पावसाचा पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम; मागणी वाढल्याने कोथिंबीर ६० तर मेथी ४१ रुपये जुडी दर

पुढारी वृत्तसेवा

मंचर: सतत सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीला यंदाच्या हंगामातील विक्रमी दर मिळाले आहेत. शुक्रवारी (दि. ३) रात्री कोथिंबिरीची एक जुडी तब्बल ६० रुपये, तर मेथीची जुडी ४१ रुपये दराने विकली गेली. या दरवाढीमुळे पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

२८ जून ते ३ जुलै या कालावधीत झालेल्या संततधार पावसाचा कोथिंबीर, मेथी, शेपू आणि पालकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी बाजारातील आवक घटली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.

आंबेगाव, शिरूर आणि राजगुरूनगर तालुक्यातील काही मोजक्याच भागांत सध्या कोथिंबीर व मेथीची पिके शिल्लक आहेत. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने पुढील काही दिवसही पालेभाज्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाजार समितीत दर्जेदार मालाला चांगली मागणी असून, आवक वाढल्यानंतरच दरात स्थिरता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादन घटल्याने बाजारभाव वाढले आहेत.

सध्या मिळणारा चांगला भाव हा नुकसानीची काहीअंशी भरपाई करणारा ठरत असून, पुढील पावसावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे, असे वळती येथील कृषिनिष्ठ शासकीय पुरस्कारविजेते शेतकरी धोंडीभाऊ भोर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT