

पुणे: पोलिस ड्युटीवर गणवेशावरील नेमप्लेट मोबाईलने झाकून ठेवण्याचे प्रकार पुणे शहरात वाढल्याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. विशेषतः वाहतूक शाखेतील काही कर्मचार्यांकडून नेमप्लेट दिसू नये, यासाठी मुद्दाम मोबाईल, वॉकीटॉकी, चालान मशिन वरच्या खिशात ठेवले जात असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर अशा अधिकारी, कर्मचार्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. दरम्यान दै. 'पुढारी'ने याबाबत 'नेमप्लेट झाकून वाहतूक पोलिसांची कारवाई' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते.
शहरात वाहतूक नियमन किंवा कारवाईदरम्यान अनेक पोलिस कर्मचारी गणवेशाच्या वरच्या खिशात मोबाईल फोन ठेवतात. त्यामुळे त्यांची नेमप्लेट पूर्णपणे झाकली जाते. परिणामी, संबंधित पोलिस कर्मचार्याचे नाव नागरिकांना दिसत नसल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण होते. काही ठिकाणी कारवाई करतानाच नेमप्लेट झाकण्याची पद्धत रूढ झाल्याचेही वरिष्ठांच्या निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे पोलिस दलाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत शहरातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक शाखा तसेच इतर विभागांना लेखी आदेश पाठविण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्याची नेमप्लेट कर्तव्यावर असताना स्पष्टपणे दिसेल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर टाकण्यात आली आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाने यापूर्वीही नेमप्लेट स्पष्ट ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे वारंवार आढळून आले.
त्यामुळे आता जाणूनबुजून नेमप्लेट झाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा आदेशातून देण्यात आला आहे. प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
आदेशात नेमके काय?
गणवेशावरील नेमप्लेट नेहमी स्पष्ट दिसणे बंधनकारक. वरच्या खिशात मोबाईल किंवा अन्य वस्तू ठेवून नेमप्लेट झाकता येणार नाही. नेमप्लेट जाणूनबुजून झाकल्यास शिस्तभंगाची कारवाई.