मंचर: वयोवृद्ध महिला व पुरुषांची बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला मंचर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 3 लाख 93 हजार 193 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंचर ठाण्याच्या हद्दीत गेली काही दिवसांपासून वृद्ध नागरिकांना बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून आरोपी वृद्धांकडील सोन्याचे दागिने काढून घेत फसवणूक करीत होते. याबाबत मंचर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
गुरुवारी (दि. 9) कळंब (ता. आंबेगाव) येथील एका हॉटेलजवळ संशयास्पद कार (एमएच 12 केएन 3898) पोलिसांना आढळली. त्यात सहाजण होते. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - गणेश विनायक गायकवाड (वय 37, रा. भालगाव, ता. पाथर्डी), बंडू लक्ष्मण जाधव (वय 48, रा. गांधीनगर, जि. बीड), मनोहर भाऊसाहेब जाधव (वय 35, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी), खंडू बंडू जाधव (वय 20, रा. गांधीनगर), सतीश रस्तूम पवार (वय 33, रा.गांधीनगर),
सोमनाथ निवृत्ती फुंदे (वय 45, रा.भालगाव, ता. पाथर्डी). त्यांच्यावर मंचर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान आरोपींकडून फसवणुकीत मिळवलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.