

पुणे: पुणे जिल्ह्यात मतदार यादी सुसूत्र करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून, आतापर्यंत सुमारे 31 लाख 71 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. ही संख्या एकूण मतदारसंख्येच्या सुमारे 34 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण 91 लाख 58 हजार मतदार असून, उर्वरित मतदारांचे मॅपिंग लवकरच पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
आगामी काळात राज्यात सखोल विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्याआधीच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. यामध्ये 2002 आणि 2026 च्या मतदारयादीतील नावे जुळवून मॅपिंग केले जात आहे. एखाद्या मतदाराचे नाव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्यास त्याची नोंद ॲपच्या माध्यमातून केली जात आहे.
2002 मध्ये अन्यत्र राहणाऱ्या किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची माहिती मिळविण्यासाठी प्रशासनाने राजकीय पक्षांचे सहकार्य घेतले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांनीही बीएलओंना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे.
मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी