मंचर: आखाती युद्ध संपले असले, तरी वाढलेले इंधनदर आणि वाहतूक खर्च, यांचा परिणाम आता ड्रायफ्रुट तसेच मिठाई व्यवसायावर दिसून येत आहे. अंजीर, बदाम, काजूसारख्या ड्रायफ्रुटच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याने मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांचे गणित बिघडले आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहकांकडून मिठाई खरेदीचे प्रमाणही घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या चांगल्या प्रतीचे अंजीरचे दर १२०० रुपयांवरून १४५० ते १५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत. बदामाचे दर ८५० वरून ९०० ते ९२५ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तसेच, काजू ९०० वरून थेट १००० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुटचा वापर होत असल्याने उत्पादन खर्च वाढला असून, त्याचा थेट परिणाम मिठाईच्या दरांवर झाला आहे. महागाईमुळे ग्राहक गरजेनुसार मर्यादित खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. सण-समारंभ किंवा कार्यक्रमांशिवाय मिठाई खरेदीचे प्रमाण घटल्याने व्यापाऱ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ड्रायफ्रुटचे दर सातत्याने वाढत असल्याने मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे. ग्राहकांना जास्त दर परवडत नसल्याने खरेदी कमी झाली असून, व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत आहे.असरफिलाल महादेव गुप्ता, दूध केंद्र, मंचर
महागाईमुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे पूर्वीसारखी मिठाई किंवा ड्रायफ्रुटची खरेदी अनेक जण करीत नाहीत. आवश्यक तेवढीच खरेदी करण्यावर भर द्यावा लागत असून, खर्चाचे नियोजन कठीण झाले आहे.ऊर्मिला प्रवीण मोरडे, मंचर