प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर : बारामती तालुक्यातील एकमेव असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार वेग घेत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्याआड बऱ्याच हालचाली घडल्या. त्यामधून मागील अनेक वर्षापासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत ‘तह’ करून आपापसात जागा वाटून घेतल्या; तथापि हा तह नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार? हा प्रश्न जाणकार उपस्थित करीत आहेत. यामुळे नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्त्यांची कुचंबना तर मतदार बुचकळ्यात असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
मागील अनेक वर्षांपासून अजित पवार व रंजन तावरे यांच्यातील राजकीय संघर्ष तसेच टोकाचा विरोध माळेगावकरांनी अनुभवला आहे. राज्याच्या राजकारणात घडामोडी घडत असताना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाबरोबर युती करून सत्तेत आली, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान बारामती तालुक्यातील भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान नुकत्याच झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरु-शिष्यांनी अजित पवारांच्या पॅनेलविरोधात पॅनेल उभे करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील अजित पवारांनी तालुक्यात विरोध नको ही भूमिका स्पष्ट करत तावरे गुरु-शिष्यांना ’तहा’ची ऑफर दिली होती, हे खुद्द अजित पवारांनी वेळोवेळी सभांमध्ये स्पष्ट केले होती. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक होऊन जमतेम तीन-चार महिने उलटले असताना माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे कट्टर विरोधक रंजन तावरे यांनी स्वीकारलेली तहाची भूमिका राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र असत नाही, हे स्पष्ट करत आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व रंजन तावरे यांनी माळेगावच्या विकासाच्या नावाखाली घेतलेली ’तहा’ची भूमिका माळेगावकरांच्या पचनी पडेल का? याचे उत्तर नगरपंचायतीच्या निकालामध्ये दिसून येईल. एकूणच सर्वच उमेदवारांकडून प्रचाराचे वातावरण तापवले जात असून जसजसा प्रचार शिगेला पोहोचेल तसतशी निवडणुकीत रंगत येणार आहे, हे मात्र नक्की!
या निवडणुकीतील ज्या इच्छुकांना या तहामुळे युती, आघाडीमध्ये संधी मिळाली नाही, त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष असल्याने काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे करून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. यासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची व रंगतदार ठरणार हे मात्र नक्की.