पुणे

Pune News : रुग्णवाहिकांसाठी एसओपी बनवा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यवत (ता. दौंड), शिक्रापूर, आणगाव (ता. शिरूर) येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या ठिकाणी यंत्रणांनी सुरक्षा तसेच उपाययोजनांविषयक पाहणी करावी. आवश्यक उपाययोजनांसह अत्याधुनिक जीवरक्षक साधनसामग्री असलेल्या रुग्णवाहिका येथे जलदगतीने कशा उपलब्ध होऊ शकतील, यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पुणे मनपाचे रस्ते विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक आदी उपस्थित होते.

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने कळविलेले जिल्ह्यातील 63 ब्लॅक स्पॉट तसेच स्थानिक यंत्रणांनी निश्चित केलेली वारंवार अपघात होणारी ठिकाणे येथे अपघात झाल्यानंतर प्रतिसाद प्रणाली कशा पद्धतीने कार्यरत आहे, यासंबंधी माहितीचे विश्लेषण करावे. त्यानुसार महत्त्वाच्या क्षणी (गोल्डन अवरमध्ये) रुग्णांना उपचार मिळावा, यादृष्टीने रुग्णवाहिका तेथे गतीने उपलब्ध करता येईल, अशी व्यवस्था करावी. परिसरातील सर्व ट्रॉमा केअर सेवा उपलब्ध असलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयांची माहिती सर्व संबंधित विभागांना उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

दुचाकी, पादचार्‍यांचे अपघात सर्वाधिक

पोलिस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने या क्षेत्रातील तज्ज्ञ अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अपघातविषयक विश्लेषणात्मक अभ्यास केला आहे. यातून पुणे शहरात दुचाकी व पादचार्‍यांचे अपघातात मोठ्या प्रमाणात
मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. ही माहिती सर्व शासकीय कार्यालयांना पोहचवून त्यांना आपल्या दुचाकी वापरणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT