

राजगुरूनगर :पुढारी वृत्तसेवा : चाकण येथे मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालो म्हणून चार वर्षांपूर्वी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मी जामीनावर आहे. मी मराठा बांधवांसाठी पूर्वीपासून सक्रीय असल्याचा खुलासा खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे गेले सात दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे.आरक्षणा बाबत सरकार निर्णय घेत नाही.
संबंधित बातम्या :
तर जरांगे पाटील यांचे उपोषण लांबत चालले आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.कोणत्या क्षणी कुठे काय घडेल? याबाबत शास्वती उरलेली नाही. राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदार,खासदार यांच्या निवासस्थानी, संपर्क कार्यालयावर हल्ले होऊ लागले आहेत. खेडचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची मराठा आरक्षण आंदोलना बाबतची भुमिका जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.
आपण मराठा आमदार असुन आरक्षण मिळवण्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेत सनदशीर मार्गाने सहभागी आहे असे ते म्हणाले.
खेड तालुक्यात काही नेत्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. यावर बोलताना आमदार मोहिते पाटील म्हणाले की, राज्यात मराठा बांधव अन्न पाणी नाकारत असताना नेत्यांनी वाढदिवस साजरा करणे चुकीचे आहे.मी तालुक्यात लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहे. मात्र प्रशासनाच्या निर्देशानुसार बाहेर जाणे टाळत आहे. जरांगे पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्वानुसार आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र या आंदोलनात काही समाजकंटक आपले हित साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर प्रशासनाचा अंकुश राहणे सामाजिक गरज आहे. असे आमदार मोहिते पाटील म्हणाले.
राजगुरूनगर येथे खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नुकतीच जरांगे पाटील यांची विराट सभा झाली.दोन लाखांवर मराठा बांधव या सभेला उपस्थित होते.सरकार आरक्षणावर निर्णय घेत नाही म्हणुन रोष असताना राज्यात एकही आमदार, खासदार या आंदोलनात थेट सहभाग घेत नाही.अशा स्थितित सत्तेतील आमदार असलेले मोहिते पाटील हे व्यासपीठावर उपस्थित राहीले. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांचे स्वागत केले होते.