पुणे: तिळगूळ घ्या, गोड गोड बोला... असे म्हणत स्नेह अन् आपुलकी वाढविणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. नवीन वर्षातील हा पहिला सण बुधवारी (दि.14) आनंदात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. 13) खरेदीसाठी मंडई, रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली.
पूजेच्या साहित्यांपासून ते तिळगूळ खरेदीपर्यंतचे निमित्त पुणेकरांनी साधले, तर अनेक पतंगखरेदीलाही प्राधान्य दिले. नवीन कपड्यांसह लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणारे दागिने आणि हलव्याच्या दागिन्यांचीही खरेदी करण्यात आली. नवीन वर्षातील पहिला सण असल्यामुळे सगळीकडे हर्षोल्हासाचे वातावरण रंगले आहे. मंदिरांमध्ये केलेली फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत असून, वैविध्यपूर्ण धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरांमध्ये रंगणार आहेत, तर घराघरांत सणाची जोमाने तयारी करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या आगमनानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. तिळगुळाचा गोडवा अन आपुलकीचे अतूट बंध... असे उत्साही वातावरण सणाच्या निमित्ताने घरोघरी पाहायला मिळते. प्रत्येकजण आनंदाने एकमेकांना तिळगूळ देऊन नेहमी गोड बोलण्याची विनंती करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणाचा उत्साह सगळीकडे बहरला आहे.
मंदिरांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि यानिमित्ताने अनेकजण देवदर्शनाचे निमित्तही साधणार आहेत. संस्था-संघटनांच्या वतीने विविध सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले असून, ठिकठिकाणी तिळगूळ समारंभ होणार आहेत. घराघरांमध्ये पारंपरिक वेशभूषेत विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करून एकमेकांसोबत हा सण आनंदाने साजरा केला जाईल. घरोघरी पंचपक्वानांचा बेत आखला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सणाच्या खरेदीसाठी अनेकांनी बाजारपेठ गाठली. महिला-तरुणींनी सुगड, गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळ, तिळगूळ तसेच हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणारे फुलांची खरेदी केली. रविवार पेठेत पतंगखरेदीसाठीही गर्दी पाहायला मिळाली. लहान मुलांनी कार्टुन्सचे चित्र असलेले पतंग खरेदी केले, तर विविध प्रकारच्या आणि मोठ्या आकारातील पतंगखरेदीला तरुणाईचा प्रतिसाद मिळाला.
तिळगूळ अन् तिळाचे लाडूखरेदीला प्रतिसाद
तिळाची वडी, तिळाचे लाडू, साखर, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळाली. तिळगूळ खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिळगुळ, तिळवडी आणि तिळाचे लाडू याला सर्वाधिक मागणी होत आहे. स्पेशल केशर मँगो वडी, पिस्ता वडी यालाही मागणी आहे. लहान मुलांचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत, असे व्यावसायिक महेश ढेंबे यांनी सांगितले.