दिगंबर दराडे
पुणे : महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (महारेरा) गेल्या 10 महिन्यांत तब्बल 5,200 हून अधिक तक्रारींचे निवारण केले असून, दोषी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता व घरखरेदीदारांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दिशेने हा सकारात्मक बदल मानला जात आहे. (Latest Pune News)
ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीत राज्यभरात 3 हजार 743 नवीन तक्रारी दाखल झाल्या. त्याच काळात आधीच्या व नवीन मिळून 5 हजार 267 तक्रारींचे निकाल देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे आता पहिली सुनावणी 1 ते 2 महिन्यांच्या आत घेतली जात असून, यामुळे तक्रारदारांना महिनोन्महिने प्रतीक्षा करण्याची वेळ येत नाही. ‘घर खरेदी म्हणजे आयुष्यभराची बचत. त्यामुळे प्रत्येक खरेदीदाराचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, असे ‘महारेरा’च्या अधिकाऱ्यांनी ‘पुढारी’बरोबर बोलताना सांगितले.
‘महारेरा’ने अलीकडेच नवीन नियमानुसार प्रकल्प नोंदणीसाठी सादर होण्यापूर्वी कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक तपासणी अनिवार्य केली आहे. या तिहेरी पडताळणीमुळे भविष्यात अर्धवट राहिलेले किंवा विलंबित प्रकल्प थांबविण्यास मदत होईल. 2017 मध्ये महारेराची स्थापना झाल्यापासून आजवर 30 हजार 833 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 23 हजार 726 तक्रारींचे निवारण झाले आहे. राज्यात 51 हजार 481 प्रकल्प नोंदणीकृत असून, यातील सुमारे 5 हजार 792 प्रकल्पांवर तक्रारी दाखल आहेत.
पुणे हे राज्यातील सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्प असलेले शहर असून, तक्रारींची संख्याही इथे लक्षणीय आहे. बहुतांश तक्रारी प्रकल्प पूर्ण होण्यात होणाऱ्या विलंब, सुविधांची उणीव आणि वचनभंग याबाबत आहेत. तथापि, मागील काही महिन्यांत निर्णय प्रक्रियेला गती मिळाल्याने पुण्यातील घर खरेदीदारांनाही दिलासा मिळत आहे.
‘महारेरा’ च्या या जलद निर्णय प्रक्रियेमुळे बिल्डर्सवर दडपण वाढले आहे. हे पुण्यातील बाजारासाठी अत्यंत आरोग्यदायी लक्षण आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ निर्णय होणे पुरेसे नाही; तर त्या आदेशांची अंमलबजावणी बिल्डरकडून त्वरित होणे हेच खरे यश ठरेल. तरीही महारेराच्या या गतीमुळे घरखरेदीदारांचा विश्वास वाढला आहे आणि रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
आम्ही पुण्यामध्ये बाणेरला घर खरेदी केले होते. मात्र, वेळेवर बिल्डरांकडून घर मिळाले नाही. आम्ही वेळोवेळी पैसे देत होतो, तरी देखील आम्हाला वेळेवर घर मिळाले नाही. ‘महारेरा’कडे तक्रार केली होती. आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळाले.रोहिणी देशपांडे, घरखरेदीदार