Electricity Pudhari
पुणे

Mahavitaran New Electricity Connection: नवीन वीज कनेक्शन आता ठरलेल्या कालमर्यादेतच

महावितरणची नवी ऑनलाईन प्रणाली 1 जानेवारीपासून लागू, पारदर्शकतेत वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसांत, शहरांमध्ये सात दिवसांत आणि ग्रामीण भागात 15 दिवसांत नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महावितरणकडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीज पुरवठा सेवा दिली जाते. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जासोबत दाखलेही जोडता येतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अर्जाची व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते. ग्राहकाने पैसे भरले, की नवा मीटर जोडून ग्राहकाला वीज कनेक्शन दिले जाते.

सध्याची ही पद्धती अर्ज केल्यापासून नवे कनेक्शन दिल्याची यंत्रणेत नोंद होण्यापर्यंत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना हमखास आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत नवी जोडणी मिळण्याचा विश्वास महावितरणच्या प्रशासनाला वाटतो.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महानगरांसाठी तीन दिवस, शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात 15 दिवसांत कनेक्शन देण्याची तरतूद केली असली तरी ती जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यासाठी ही कालमर्यादा आहे.

नव्या वर्षात सुरुवात

महावितरणच्या प्रशासनाने केलेल्या सुधारणेमुळे नवीन वीज कनेक्शन देण्याच्या कामात गतिमानता येईल आणि अधिक पारदर्शकता येईल, असाही विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणची ही व्यवस्था 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT