पुणे : राज्यात 36 जिल्ह्यांतून 395 नोंदणीकृत रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी 337 कार्यरत रक्तपेढ्यांतर्गत 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत 16 लाख 46 हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे. यामध्ये 99.75 टक्के रक्तसंकलन ऐच्छिक स्वरूपात झाले आहे. भारतात सिक्कीममध्ये 98 टक्के, त्रिपुरा 96.7 टक्के, तामिळनाडू 94 टक्के तर चंदीगडमध्ये 93.6 टक्के ऐच्छिक रक्तसंकलन झाले आहे. म्हणजेच, महाराष्ट्र देशात रक्तसंकलनात आघाडीवर असल्याचे दिसून येते. (Latest Pune News)
केंद्रीय धोरणानुसार शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. भारतात 2025 च्या आकडेवारीनुसार एकूण 3840 नोंदणीकृत रक्तपेढ्या आहेत. यामध्ये 2024-25 मध्ये 1,46,01,147 रक्त पिशव्या गोळा आहेत. यामध्ये 70 टक्के रक्त संकलन ऐच्छिक स्वरूपात होते. ऐच्छिक रक्तदानाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणांवर जनजागृती करणे आवश्यक आहे. ऐच्छिक रक्तदाता हा रक्तपेढीसाठी, रुग्णांसाठी देवदूत असतो, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे.
1 आक्टोबर हा डॉ. जय गोपाल जॉली यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय रक्तदान दिन म्हणून सन 1975 पासून साजरा केला जातो. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुंटूंब कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संगठन यांविभागांतर्गत हा दिवस देशभर साजरा केला जातो. डॉ. जॉली यांनी रक्तदान क्षेत्रातील रक्त खरेदी-विक्री विरोधी मोहिम आणि व्यावसायिक रक्तदाता विरोधी अभियान देशभरात राबविले होते. यांचे हेच अभियान भारतीय राष्ट्रीय रक्त धोरण म्हणून भारत सरकारने घोषित केले, अशी माहिती ससूनचे समाजसेवा विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
शरीरातील एकून रक्तापैकी पाच-सहा टक्केच रक्त आपण दान करतो. मानवी रक्त कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत तयार होत नाही. त्यामुळे रक्तदानाशिवाय त्याला पर्याय नाही. एकाच्या रक्तदानातून दोन ते तीन रुग्णांचा जीव वाचवू शकतो. रक्तदानाद्वारे दिलेले रक्त दात्याला कोणत्याही प्रकारचा थकवा न येता आठ ते 24 तासात शरीर निसर्गतः रक्त भरुन काढते. बोनमॅरो सक्षम होण्यास मदत होऊन नवीन रक्त निर्मितीस चालना मिळते. नियमित रक्तदान केल्याने ह्रदयविकार, यकृताचे विकार, कॅन्सर, बेन हॅमरेज आणि एकंदरीत रक्त गोठण्याचे विकार सहजासहजी होत नाहीत, असे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. -डॉ. शंकर मुगावे, समाजसेवा विभागप्रमुख, ससून रुग्णालय