नारायणगाव: सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांसह कारखानदारांनी व्यक्त केली आहे. याचा थेट फटका साखर कारखान्यांच्या साखर उत्पादन आणि उत्पन्नावर होणार असल्याचेही बोलले जात आहे. (Latest Pune News)
राज्य सरकारने सहकारी व खासगी कारखाने 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार हंगाम सुरू होण्यास चार दिवस राहिले आहेत. त्यातच गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे तोडणीला आलेल्या उसाच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे त्या ऊस तोडणीला अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, सर्व साखर कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. अनेक साखर कारखान्यांवर ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. कारखान्यांनी विभागवार टोळ्यांची वाटणी केली असून प्रत्येक गटांमध्ये मजुरांनी कोप्या थाटल्या आहेत. ऊस तोडणीचे सर्व नियोजन अंतिम करण्यात आले आहे. बहुतांशी साखर कारखान्यांची गेट केन उसावर भिस्त आहे. तसेच करार केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्याने पळवू नये म्हणून उसाच्या फडाजवळच तोडणी मजुरांची सोय केल्याचे दिसून येते.
परंतु अवकाळी पावसामुळे ऊस पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ऊस तोडणीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार आहे. तोडणीसाठी वापसा येण्याची वाट पहावी लागणार असल्याने साखर कारखान्यांना मोठी चिंता लागली आहे.
सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. हंगाम सुरू झाल्यावर साखर कारखाने पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करू शकणार नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेले व मुरमाड क्षेत्रातील ऊस तोड करावी लागणार आहे. तसेच ऊस तोडणी मजुरांना देखील काम मिळणार नसल्याने त्यांचे देखील नुकसान होणार आहे.भास्कर घुले, कार्यकारी संचालक, विघ्नहर कारखाना
ऊस तोडणी मजुरांची तारांबळ ऊस तोडणीसाठी आणलेल्या मजूरांना या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मजुरांना पावसात भिजण्याची वेळ आली आहे. त्यांना उघड्यावरच स्वयंपाक करावा लागत आहे. काही साखर कारखान्यांनी या मजुरांची काळजी म्हणून कोप्या झाकण्यासाठी ताडपत्री पुरविली आहे. मात्र सध्या त्यांच्या हाताला काम नाही. त्यातच पावसामुळे ऊस तोडणी लांबली तर त्यांचे हाल वाढणार आहेत.
इतर पिकांचे मोठे नुकसान
गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने उसासह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. फ्लॉवर, कोबीसारखी पिके शेतातच सडू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे पीकही पावसामध्ये भिजले असून, यातून सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.