

पुणे : पीएमपी बस प्रवासादरम्यान प्रवाशाला चालक-वाहकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रवाशाचा चष्माही तुटल्याचे समोर आले असून, त्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना हडपसर गाडीतळावरील असल्याची प्राथमिक माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. मात्र, नेटकऱ्यांसह प्रवाशांकडून या घटनेवरून प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.(Latest Pune News)
पीएमपी प्रवासी, इतर दुचाकी-चारचाकी चालक आणि पीएमपीचे चालक-वाहक यांच्या मारामारीच्या घटना आता सातत्याचेच झाले आहे. त्यांचे व्हिडीओ देखील सातत्याने व्हायरल होत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भर रस्त्यात प्रवासी असो किंवा कोणीही असो, त्याला अशाप्रकारे मारहाण करणे चुकीचे आहे. सध्या चालक-वाहकांची निवड ठेकेदारांकडून केली जात आहे. चालक-वाहक निवडीत पीएमपीने लक्ष घातले पाहिजे. शक्यतो प्रौढ वयातील म्हणजे 40-45 वयोगटातील कर्मचाऱ्यांची निवड झाली पाहिजे. पीएमपीने चालक-वाहकांना प्रशिक्षण देणे सध्याची गरज बनली आहे. त्यांना सीआरआरटी आणि मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी प्रशिक्षण द्यायला हवे.
संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच
या घटनेचा व्हिडीओ आम्ही पाहिला आहे, ही घटना हडपसर गाडीतळ भागातील असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे. या घटनेबाबत हडपसर आगार प्रमुखांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर संबंधित चालक-वाहकांवर कडक कारवाई केली जाईल.
किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल