UDID Pudhari
पुणे

Maharashtra UDID Card Scheme: राज्यातील ४.९७ लाख दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत; ६० हजारांकडे अद्याप यूडीआयडी कार्ड नाही

विशेष साहाय्य योजनांतर्गत २४५ कोटींचे वाटप; १.२० लाख लाभार्थ्यांची पडताळणी प्रलंबित, डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील विशेष साहाय्य योजनांचा लाभ घेणार्‍या ४ लाख ९७ हजार दिव्यांग लाभार्थ्यांपैकी ६० हजार जणांकडे अजूनही 'युनिक डिसॅबिलिटी आयडी' (यूडीआयडी) कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय १ लाख २० हजार लाभार्थ्यांची यूडीआयडी कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३ लाख १७ हजार लाभार्थ्यांकडेच वैध यूडीआयडी कार्ड उपलब्ध आहे.

दरम्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या तीन योजनांच्या माध्यमातून एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सुमारे २४५ कोटी रुपये राज्यातील दिव्यांग नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विशेष साहाय्य योजनांच्या निधीवितरणास मंजुरी दिली असून, पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे अर्थसाहाय्य जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अलिकडेच या योजनांतील मासिक अर्थसाहाय्य दीड हजारावरून अडीच हजार रुपयांपर्यंत वाढवले आहे. त्यानुसार राज्यातील यूडीआयडी कार्डधारक दिव्यांग नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत दरमहा आर्थिक साहाय्य दिले जात आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत राज्यातील पाच लाखांहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २४५ कोटींहून अधिक रक्कम थेट जमा केली आहे.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील ५ लाख १७ हजार यूडीआयडी कार्डधारक दिव्यांग नागरिकांना या योजनांचा लाभ दिला जात आहे. एप्रिलमध्ये तिन्ही योजनांच्या माध्यमातून ४.९२ लाख लाभार्थ्यांना एकूण १२२ कोटी ६८ हजार १०० रुपये वितरित करण्यात आले. यामध्ये इंदिरा गांधी योजनेतून १२ हजार ६७३ दिव्यांगांना २ कोटी ७८ लाख, संजय गांधी योजनेतून ४ लाख ४४ हजार ९७० लाभार्थ्यांना १११ कोटी २४ लाख २५ हजार रुपये वाटप केले, तर श्रावण बाळ योजनेतून ३४७०५ दिव्यांगांना ८ कोटी ६२ लाख ५०० रुपये देण्यात आले. विशेष साहाय्य योजनांसाठी पात्र असलेल्या दिव्यांग नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयात त्वरित अर्ज करावे, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाने केले.

१ लाख २० हजार दिव्यांगांची तपासणी अद्याप बाकी

राज्यातील १ लाख २० हजार दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी व पडताळणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसली, तरी अशा पात्र लाभार्थ्यांनाही योजनांचा लाभ सुरू ठेवण्यात येत असल्याची माहिती विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

मे महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली

मे महिन्यात लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन ४ लाख ९७ हजार २२३ दिव्यांग नागरिकांच्या बँक खात्यात १२३ कोटी ५२३०० रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत मिळून २४५ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक साहाय्य दिव्यांग नागरिकांना देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT