पुणे: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने खुल्या बाजारातील साखरेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन दिनांक २१ नोव्हेंबरपासून मालतारणावरील खुल्या साखरेचा सुधारित मुल्यांकन दर प्रतिक्विंटलला ४५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व साखर कारखान्यांना वाढीव मूल्यांकन दर लागू राहील. प्रत्यक्षात उचल दर ४०५० रुपये असून, त्यातून बँक कर्जवसुली प्रति क्विंटलला ७५० रुपयांप्रमाणे करण्यात येत असल्याच्या सूचनाही बँकेंने सर्व सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या आहेत. वाढीव मूल्यांकनामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांना पहिली उचल रक्कम देण्यासाठी त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्यात येत असल्याने हंगाम २०२५-२६ मधील विक्रीयोग्य तसेच हंगाम २०२६-२७ मधील उत्पादित साखरेवर मूल्यांकन नवीन दराने केले जाईल. यापूर्वी कळविल्यानुसार एक वर्षापर्यंतचा साखरसाठ्यावर १० टक्के दुरावा राखला जाईल. तसेच एक वर्षावरील (जुन्या) साखरसाठ्यावर पूर्वीप्रमाणेच प्रतिवर्ष पाच टक्के याप्रमाणे दुरावा वाढविला जाईल. तीन वर्षांवरील साखरसाठा कर्ज उचलीस पात्र असणार नाही. मात्र, बँकेच्या कर्जास तारण राहील. साखरसाठ्यावरील दुरावा दिनांक १ डिसेंबरपासून निश्चित केला जाईल.
...तर वाढीव कर्जवसुली २०० रुपयांनी होणार
सध्याच्या चालू ऊस गाळप हंगामात अंदाजित गाळपापेक्षा प्रत्यक्षात कमी गाळप होणार असल्याने बँक कर्जाच्या वसुलीकरिता प्रतिक्विंटल २०० रुपये वाढीव टॅगिंग आकारण्यात येईल. त्यानुसार सुधारित उचल दरानुसार मालतारण एक-अ खात्यावर २०२६-२७ च्या हंगामात गळितासाठी येणाऱ्या उसाचे पेमेंट करण्याकरिता साखर कारखान्यांवर ३१०० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे उचल दिली जाईल.
कारखान्यांनी शासनाने घोषित केलेल्या एफआरपी इतपतच रक्कम ऊस उत्पादकांना अदा करणे आवश्यक राहील. तसेच कारखान्यांनी अन्य वित्तीय संस्था, बँकांकडून कर्ज घेऊन, ठेवी स्वीकारून वाढीव ऊसदर देता येणार नाही. या दोन्ही बाबी मान्य असल्याबाबत कारखान्यांचे संचालक मंडळाने ठरावासह पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर सादर करावे.
तसेच साखरेचा प्रतिक्विंटलचा मूल्यांकन दर व प्रत्यक्ष करविरहित साखर विक्री टेंडर दर यातील जास्त दराने साखर विक्रीची रक्कम प्राप्त रक्कम मालतारण खाती भरणा करून घेऊनच मालतारणातून साखर पोती सोडण्यात येतील, असे पत्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी पाठविलेले आहे.
राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम २०२६-२७ सुरू आहे. खुल्या बाजारात साखरेचे दर क्विंटलला पाच हजार रुपयांच्या वर असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि शेतकरी संघटनांकडून बँकेस सातत्याने करण्यात येत होती. यापूर्वीचा प्रतिक्विंटलचा दर ४२०० रुपये होता. त्यामध्ये ३०० रुपयांनी वाढ करून क्विंटलला ४५०० रुपये सुधारित मूल्यांकन केले आहे. त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना द्यावयाच्या पहिल्या हप्त्याच्या रकमेसाठी साखर कारखान्यांना होण्याची अपेक्षा आहे.विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित.