Sugar Pudhari
पुणे

Maharashtra Sugar Production: राज्यात 2025-26 ऊस गाळप अंतिम टप्प्यात; साखर उत्पादनात मोठी वाढ

कोल्हापूर विभाग आघाडीवर, गतवर्षापेक्षा 215 लाख मेट्रिक टन अधिक ऊस गाळप

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यातील यंदाचा 2025-26 चा ऊस गाळप हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे झुकला आहे. सद्य:स्थितीत 82 लाख 55 हजार मेट्रिक टन इतके साखर उत्पादन तयार झालेले आहे. पुणे विभागात 199.52 लाख मे. टन इतके सर्वाधिक ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर सर्वाधिक साखर उत्पादन आणि निव्वळ साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी कायम आहे. या विभागात 206.21 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले असून, 10.85 टक्क्यांइतका साखर उतारा असल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

राज्याचा 9.29 टक्के निव्वळ साखर उतारा राहिला असून, 200 कारखान्यांनी मिळून आत्तापर्यंत 888 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केलेले आहे. 15 मार्चपर्यंत ऊस गाळप हंगाम सुरू राहणे अपेक्षित असून, मोजकेच कारखाने त्यानंतरही सुरू राहण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.

कोल्हापूर विभागात 37 कारखान्यांकडून 190 लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. या विभागाने साखर उत्पादन आणि उताऱ्यात बाजी मारली आहे. त्याखालोखाल साखर उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुणे विभागात 191.52 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले असून, 9.61 टक्के निव्वळ साखर उतारा आहे.

सोलापूर विभागात सर्वाधिक 48 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतलेला आहे. या विभागात 192.86 लाख मे. टन इतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे, तर 8.42 उताऱ्यानुसार 162.43 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झालेले आहे. अहिल्यानगर विभागात 26 कारखान्यांनी मिळून 110.63 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 8.85 टक्के उताऱ्यानुसार 97.88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखान्यांनी 87.39 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 7.9 टक्के उताऱ्यानुसार 69.06 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे. नांदेड विभागात 30 कारखान्यांनी 97.22 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 9.14 टक्के उताऱ्यानुसार 88.89 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. अमरावती विभागात चार कारखान्यांनी 9.68 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले असून, 9.07 टक्के उताऱ्यानुसार साखरेचे 8.78 लाख क्विंटल उत्पादन हाती आले आहे. तर, नागपूर विभागात तीन कारखान्यांनी दीड लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले, तर 4.47 टक्के उताऱ्यानुसार 67 हजार क्विंटल साखर उत्पादन तयार झालेले आहे.

गतवर्षापेक्षा 215 लाख मे. टनांनी अधिक ऊस गाळप पूर्ण...

गतवर्षी राज्यात 199 साखर कारखान्यांनी मिळून 673 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले होते. यंदा 888 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाल्याने यंदा 215 लाख मे. टनांनी अधिक ऊस गाळप झालेले आहे. अद्यापही हंगाम सुरू असल्याने ऊस गाळपाचा एकूण आकडा आणखी वाढणार आहे. साखर उत्पादन 21 लाख मे. टनांनी वाढलेले असल्याचेही साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालावरून दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT