Sugar Pudhari
पुणे

Maharashtra Sugar Production 2025: महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामात 21.75 लाख टन साखरेचे उत्पादन

270 लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण; निव्वळ साखर उतारा 8.05 टक्के; कोल्हापूर विभाग आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील ऊस गाळप हंगामाने आता जोर पकडला असून सद्यस्थितीत 4 डिसेंबरअखेर सुमारे 270 लाख मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे, तर 8.05 टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार 21 लाख 75 हजार टनाइतके साखर उत्पादन हाती आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे दुप्पट गाळप झाल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात नमूद आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. मात्र, दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे पहिला पंधरवडा जेमतेम कारखान्यांकडूनच ऊस गाळप सुरू राहिले. परंतु आता ऊस गाळप हंगामाने चांगलाच वेग पकडला आहे.

गतवर्षी याच दिवशी 179 कारखाने सुरू होते. त्यांनी 115 लाख 83 हजार मे.टन ऊस गाळप पूर्ण केले होते, तर 7.48 टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार राज्यात 86.61 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले होते. तर सद्यस्थितीत 89 सहकारी आणि 89 खासगी मिळून 178 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यांकडून सद्यस्थितीत प्रतिदिन 9 लाख 80 हजार 550 मेट्रिक टनाइतके ऊस गाळप सुरू आहे.

साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर आघाडीवर

राज्यात सद्यस्थितीत 64.85 लाख मे.टनाइतके सर्वाधिक ऊस गाळप पुणे विभागाने करून आघाडी घेतली आहे. कोल्हापूर विभाग 62.35 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण करून दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, कोल्हापूर विभागात साखर उत्पादन व निव्वळ साखर उतारा सर्वाधिक आहे.

कोल्हापूर विभागाने सर्वाधिक 9.4 टक्के उताऱ्यानुसार 58.6 लाख क्विंटल साखर उत्पादन घेत अग््रास्थान कायम राखले आहे. त्यानंतर ऊस गाळप व साखर उत्पादनात सोलापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर विभाग येतो.

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात ऊस गाळप हंगामाचे सुयोग्य नियोजन केले. त्यामुळेच राज्यात आतापर्यंत 102 खासगी व 101 सहकारी साखर कारखान्यांना ऑनलाईनद्वारे ऊस गाळप परवाने वितरित केले आहेत. सद्यस्थितीत ऊस गाळप परवान्यासाठी शासनाने निश्चित केलेली रक्कम न भरणे, अपूर्ण प्रस्ताव व अन्य मुद्द्‌‍यांमुळे केवळ 10 कारखान्यांना गाळप परवाने देणे बाकी आहे. तेसुद्धा पुढील आठवड्यात देण्यास आमचे प्राधान्य असेल.
महेश झेंडे, साखर सहसंचालक (विकास ), साखर आयुक्तालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT